IPL 2025 KKR vs RCB Match Score Updates: आयपीएल २०२५ ची दणक्यात सुरूवात झाली आहे. केकेआर आणि आरसीबी यांच्यातील पहिल्याच सामन्यातील पहिल्या डावात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. आरसीबीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरच्या फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली, पण आरसीबीनेही कमालीचं पुनरागमन करत केकेआरला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. पण या सामन्यात सुनील नरेनने स्टंप्सवर बॅट मारल्याची घटना घडली, पण त्याला बाद देण्यात आले नाही.

आरसीबीने गोलंदाजीला चांगली सुरूवात करत पहिल्या दोन षटकांत एक विकेट मिळवत केकेआरला ५ धावा करू दिल्या. पण नंतर अजिंक्य रहाणे आणि सुनील नरेन यांनी शतकी भागीदारी करत १० षटकांच्या आत १०० धावांचा टप्पा गाठला. पण सततच्या विकेटमुळे केकेआरचा संघ ८ विकेट गमावत १७४ धावाच करू शकला. केकेआरची सुरूवात पाहता संघ २०० धावांचा टप्पा सहज गाठू शकेल, असे वाटत होते पण आरसीबीने कमालीचा पुनरागमन केलं. ज्यामध्ये क्रुणाल पंड्याने ३ विकेट्स घेतले.

केकेआरचा सलामीवीर सुनील नरेनने पहिल्या डावात मोठी चूक केली. ज्यामुळे तो बाद झाला असता, पण मैदानात काहीतरी वेगळंचं घडलं. नरेनने या डावात त्याच्या बॅटने बॉलला जोरदार फटका मारला पण त्याने त्याची बॅटही विकेटवर मारली. मात्र असे असूनही त्याला हिटविकेट देण्यात आली नाही, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण नेमका काय नियम आहे, जाणून घेऊया.

आठव्या षटकात रसिख दर सलामच्या षटकात सुनील नरेनबरोबर ही घटना घडली. रसिकच्या या षटकातील चौथा चेंडू शॉर्ट पिच होता. नरेनने खेळण्याचा प्रयत्न केला पण शेवटच्या क्षणी बॅट बाजूला केली. चेंडू त्याच्या डोक्यावरून गेला आणि विकेटकीपरच्या हातात गेला. विकेटकीपरने चेंडू टिपला आणि काही सेकंदातच नरेनची बॅट स्टंपला लागली.

बॅट स्टंप्सवर आदळताच बेल्स पडल्या आणि आरसीबीचे क्षेत्ररक्षक उत्साहित आणि थोडे गोंधळलेले दिसले. नरेनला कदाचित हिट-विकेट आऊट मिळेल, अशी त्यांना आशा होती. पण पंचांनी तसे केले नाही आणि यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नियमानुसार पंचांचा निर्णय योग्य होता.

नरेनला हिट विकेट आऊट का दिलं नाही, काय सांगतो नियम?

मेरीलेबोन क्रिकेट क्लब म्हणजेच MCC च्या नियम ३५.२ नुसार, चेंडू खेळण्याच्या प्रक्रियेनंतर फलंदाजाची बॅट किंवा शरीराचा भाग लागून बेल्स पडल्यास तो खेळाडू नाबाद मानला जाईल. म्हणजे एक चेंडू पूर्ण खेळून झाल्यानंतर त्याच्या बॅटमुळे स्टंपवरील बेल्स पडतात, तर तो फलंदाज नाबाद ठरतो. असंही तो चेंडू पंचांकडून वाईड देण्यात आला, त्यामुळे तो चेंडू गणला गेला नाही, त्यामुळे हिट विकेटचा प्रश्नच नव्हता.

नरेनच्या बाबतीतही असंच घडले. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात गेला होता. नरेन त्याच्या जागी उभा होता आणि हात मागे केल्याने बॅट स्टंपला लागली. तसेच, बॅट स्टंपला लागण्यापूर्वीच अंपायरने तो चेंडू वाइड बॉल दिला होता, त्यामुळे या चेंडूची क्रिया पूर्ण झाली होती.

Story img Loader