KKR vs RCB Turning Point of Match IPL 2025: आरसीबीने आयपीएल २०२५ चा श्रीगणेशा विजयासह केला आहे. बंगळुरू संघाने पहिल्याच सामन्यात गतविजेत्या केकेआरचा ७ विकेट्सने पराभव करत शानदार विजय नोंदवला. केकेआरने प्रथम फलंदाजी करताना १७५ धावा केल्या, तर आरसीबीने लक्ष्याचा पाठलाग करताना १६.२ षटकांत विजय मिळवला. कृणाल पंड्या, विराट कोहली-फिल सॉल्टची भागीदारी हे संघाच्या विजयाचे स्टार ठरले. पण फलंदाजी नाही तर पहिल्या डावात ठरला सामन्याचा टर्निंग पॉईंट.
आरसीबीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याता निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केल्यानंतर, केकेआरने निर्धारित २० षटकांत आठ विकेट्स गमावत १७४ धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणेने आपला अनुभव आणि कौशल्याच्या जोरावर २५ चेंडूत वादळी अर्धशतक झळकावले आणि संघाला मोठ्या धावसंख्येचा भक्कम पाया रचून दिला. त्याला सुनील नरेनने चांगली साथ दिली आणि या दोघांनी शतकी भागीदारी रचली. परंतु कृणाल पंड्या आणि आरसीबीच्या इतर गोलंदाजांनी केकेआरच्या फलंदाजीला खिंडार पाडले.
धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी ९५ धावांची भागीदारी रचत संघाचा विजय निश्चित केला. या दोघांच्या खेळीसह आरसीबीने २२ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला आणि अशा प्रकारे ७ विकेट्सनी विजय मिळवला. फिल सॉल्टने ५६ धावा केल्या तर कोहली ५९ धावांवर नाबाद राहिला. तर कर्णधार रजत पाटीदारने झटपट ३० धावांची खेळी केली.
RCB च्या विजयाचा काय ठरला टर्निंग पॉईंट?
कोलकाता नाईट रायडर्सने १० षटकांत १०७ धावा करत फक्त १ विकेट गमावली होती. त्यामुळे केकेआरचा संघ मोठी धावसंख्या उभारणार हे निश्चित होतं. पण ज्याप्रमाणे आरसीबीच्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली त्यापुढे केकेआरचे फलंदाज निष्प्रभ ठरले. सुनील नरेन आणि अजिंक्य रहाणेच्या विकेटनंतर आरसीबीचा डाव पत्त्यांसारखा कोसळला. एकही फलंदाज मैदानात टिकू शकला नाही. १० षटकांत १ बाद १०७ धावा ते १४ षटकांत ४ बाद १४३ धावा अशी केकेआरची स्थिती असूनही संघ २० षटकांत केवळ १७५ धावा करू शकला.
कृणाल पंड्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सामना आरसीबीच्या बाजूने फिरवल, ज्याने ४ षटकांत २९ धावा देत ३ विकेट्स घेतले. कृणाल पंड्याने प्रथम वादळी फटकेबाजी करत असलेल्या अजिंक्य रहाणेला माघारी धाडले. यानंतर त्याने वेंकटेश अय्यर आणि रिंकू सिंग या विस्फोटक फलंदाजांना क्लीन बोल्ड करत केकेआरचं कंबरड मोडलं. सततच्या विकेटमुळे आणि भेदक गोलंदाजीमुळे आंद्रे रसेल, रमणदीप सिंहसारखे खेळाडूही मोठे फटके खेळण्यात यशस्वी ठरले.

युवा फिरकीपटू सुयश शर्माने धुलाई झाल्यानंतरही अखेरच्या षटकात चांगली गोलंदाजी करत कृणालला साथ दिली आणि रसेलला क्लीन बोल्ड करत माघारी धाडलं. यासह मधल्या षटकातील केकेआरच्या फलंदाजांच्या विकेट्स आणि कृणाल पंड्याची भेदक गोलंदाजी सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरले. कृणाल पंड्याला त्याच्या भेदक गोलंदाजीसाठी सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले.