कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या ३६व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर विजय मिळवत सलग चार पराभवांची मालिका खंडित केली. चिन्नास्वामी स्टेडियमच्या छोट्या मैदानावर केकेआरने प्रथम फलंदाजी करताना २०० धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीला केवळ १७९ धावा करता आल्या आणि हा सामना २१ धावांनी गमवावा लागला. या सामन्यात विराट कोहलीने जबरदस्त अर्धशतक झळकावले. उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावणाऱ्या विराटचे या मोसमातील हे पाचवे अर्धशतक होते. सामन्यात सहा चौकार मारणाऱ्या विराटचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याचा माजी सहकारी आणि भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज झहीर खानच्या फिटनेसवर चेष्टा-मस्करी करताना दिसत आहे.
वास्तविक, निवृत्तीनंतर झहीर खान क्रिकेट कॉमेंट्रीचा आनंद घेत आहे. सामन्याआधी विराट कोहलीला भेटल्यावर मस्तीखोर चीकूने झहीरच्या वाढत्या पोटाची खिल्ली उडवली, पोटावर थाप मारली, त्यानंतर स्विंगचा सुलतान झहीरलाही हसू आवरता आले नाही. यावेळी रॉबिन उथप्पाही तिथे उभा होता. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विराट फिटनेससाठी प्रसिद्ध आहे
एक काळ असा होता जेव्हा टीम इंडिया खराब क्षेत्ररक्षण आणि खेळाडूंच्या खराब फिटनेसमुळे बदनाम असायची. पण विराट कोहलीने राष्ट्रीय संघाचे कर्णधारपद स्वीकारताच आमूलाग्र बदल झाला. जिममध्ये खेळाडू अधिक घाम गाळू लागले. आता प्रत्येक खेळाडूकडे सिक्स पॅक ऍब्स आहेत. क्षेत्ररक्षणात भारतीय संघ ऑस्ट्रेलियन आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंशी स्पर्धा करतो.
या सामन्यात विराटने आपल्या खेळीदरम्यान एक विक्रम केला. तो टी२० क्रिकेटमध्ये एकाच मैदानावर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. चिन्नास्वामी स्टेडियमवर त्याच्या नावावर ३०१५ धावा आहेत. यापूर्वी बांगलादेशच्या मुशफिकुर रहीमने मीरपूरच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर २९८९ टी२० धावा केल्या होत्या. ३३ चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने ५० धावा करत विराट संघासाठी धावून आला. डावाच्या १२व्या षटकानंतर आरसीबीच्या खात्यात चार गडी बाद ११४ धावा होत्या. विराटच्या उपस्थितीत २०१ हे लक्ष्य अवघड वाटत नव्हते. जेव्हा आंद्रे रसेल १३वे षटक टाकायला आला तेव्हा विराटने त्याचा पहिलाच चेंडू सीमारेषेबाहेर मारला. मात्र, त्यानंतर मोठा फटका मारण्याच्या नादात डीप मिड-विकेटवर व्यंकटेश अय्यरने घेतलेल्या शानदार झेलने त्याचा डाव संपुष्टात आला आणि विजयाची आशा देखील मावळली.