आयपीएल स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यामध्ये आली असून जवळपास सर्वच संघांचे अखेरचे सामने राहिले आहेत. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्ससाठी शनिवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणारा सामना आर या पार असाच असणार आहे. सध्याच्या घडीला कोलकाताचे १३ सामन्यांमध्ये १५ गुण आहेत, तर राजस्थानने १३ सामन्यांमध्ये १४ गुण मिळवले आहेत. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांची कसोटी पाहणारा ठरणार आहे.
कोलकाताला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या गेल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात मुंबईने अखेरच्या पाच षटकांमध्ये जवळपास ७० धावा लुटल्या होत्या. फलंदाजीमध्येही युसूफ पठाणचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नव्हती. ब्रॅड हॉगसारख्या फॉर्मात असलेल्या फिरकीपटूला वगळून त्यांनी गेल्या सामन्यात चूक केली होती, ती चूक त्यांना या सामन्यात सुधारावी लागेल. फलंदाजीमध्ये रॉबिन उथप्पा आणि गंभीर यांनी संघाच्या धावांचा पाया उत्तम रचल्यावर कोलकाता मोठी धावसंख्या उभारून शकतो.
राजस्थानला गेल्या आठ सामन्यांमध्ये त्यांना फक्त एकच विजय मिळवता आला आहे. अजिंक्य रहाणेला गेल्य काही सामन्यांमध्ये मोठी खेळी साकारता आलेली नाही. गोलंदाजीमध्येही धवल कुलकर्णी आणि प्रवीण तांबे यांना गेल्या काही सामन्यांमध्ये छाप पाडता आलेली नाही. जेम्स फॉकनरकडून अजूनही अपेक्षांची पूर्ती झालेली नाही.
   
वेळ : रात्री ८.०० वा. पासून
थेट प्रक्षेपण : सेट मॅक्स आणि सोनी पिक्स वाहिनीवर.

Story img Loader