कोलकाता नाईट रायडर्सला राजस्थान रॉयल्सविरुद्ध २३ चेंडूत नाबाद ४२ धावांच्या खेळीत सात विकेट राखून फलंदाज रिंकू सिंगने विजय मिळवून दिला आहे. यानंतर फलंदाज रिंकू सिंग म्हणाला की, मी अशा संधीची पाच वर्षांपासून वाट पाहत होतो. केकेआरने १५३ धावांचे लक्ष्य १९.१ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. आयपीएल २०२२ मध्ये पाच सामन्यांच्या पराभवानंतर, कोलकाताने हा विजय मिळवला आणि प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
या सामन्यात संघाची स्टार फलंदाज रिंकू सिंगने महत्त्वपूर्ण खेळी केली. मात्र, रिंकूने सामन्यानंतर आपल्या वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. रिंकूने सांगितले की, सामना सुरू होण्यापूर्वीच त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळणार असल्याचे जाणवले होते.
डावखुऱ्या खेळाडूने सामना सुरू होण्यापूर्वी हाताच्या तळहातावर त्याचा स्कोअर लिहिल्याचा खुलासाही केला. नितीश राणा आणि रिंकू यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ केकेआरने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. यामध्ये नितीश राणा तू हातावर काय लिहिले आहे? असे विचारतो. त्यावर रिंकू सिंगने उत्तर दिले आहे. “मला वाटलं होतं की आज धावा करून मी मॅन ऑफ द मॅच ठरेल आणि मी माझ्या हातावर ५० धावा लिहिल्या आहेत,” असे रिंकूने म्हटले. त्यावर राणाने तू हे कधी लिहिले? असे विचारले. यावर रिंकू सिंगने आजच्या सामन्यापूर्वी लिहिले असल्याचे म्हटले. पुन्हा नितीश राणाने रिंकूला तुला कसं कळलं की तू आज एवढा स्कोर करशील? असा प्रश्न विचारला. यावर “प्लेअर ऑफ मॅच मिळण्यासाठी मी खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. पाच वर्षांनी ती संधी आली पण शेवटी,” असे रिंकून म्हटले.
या सामन्यात रिंकूचे पहिले अर्धशतक हुकले, पण २३ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या आणि संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. रिंकू फलंदाजीला आला तेव्हा कोलकात्याची धावसंख्या १२.५ षटकांत ३ बाद ९२ अशी होती आणि संघाला ४३ चेंडूंत ६१ धावांची गरज होती. रिंकूला हातावर लिहिल्याप्रमाणे ५० धावा करता आल्या नाहीत. मात्र, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळण्याबाबतचा रिंकूचा दुसरा अंदाज खरा ठरला.
दरम्यान, केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्ससाठी बटलरला अप्रतिम कामगिरी करता आली नाही. २५ चेंडूत २२ धावा करून तो बाद झाला, तर त्याआधी पडिक्कल २ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. संथ सुरुवातीनंतर, कर्णधार संजू सॅमसनने ५४ धावांचे अर्धशतक झळकावले. तर शेवटी शिमरॉन हेटमायरने १३ चेंडूत २७ धावांची नाबाद खेळी खेळून संघाला १५२ धावांपर्यंत नेले. केकेआरकडून टीम साऊदीने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात चांगली झाली नाही. अॅरॉन फिंच ४ आणि बाबा इंद्रजीत १५ धावा करून बाद झाले. यानंतर धावा काढण्याची जबाबदारी कर्णधार श्रेयस अय्यर आणि नितीश राणा यांनी सांभाळली. दोन्ही खेळाडूंमध्ये तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. अय्यरला वैयक्तिक ३४ धावांवर बोल्टने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.