IPL 2025 KKR vs SRH: आयपीएल २०२५ मध्ये ११ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात ईडन गार्डन्सच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात केकेआरने फलंदाजी करत हैदराबादसमोर २०१ धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये मोठे बदल करण्यात आले. यामध्ये सनरायझर्स हैदराबादच्या संघात नव्या अष्टपैलू खेळाडूला पदार्पणाची संधी दिली. या खेळाडूने पहिल्या डावात दोन्ही हातांनी गोलंदाजी केली. कोण आहे हा खेळाडू?
आपण अनेकदा ऐकलंय की एकतर डावखुरा गोलंदाज असतो किंवा उजव्या हाताने गोलंदाजी करतो. पण आयपीएलमध्ये पहिल्यांदाच या अष्टपैलू खेळाडूने दोन्ही हातांनी गोलंदाजी केली आहे. फक्त गोलंदाजीच नाही केली तर त्याने मोठी विकेटही मिळवली.
सनरायझर्स हैदराबादकडून केकेआर विरूद्धच्या सामन्यात कामिंदू मेंडिसला पदार्पणाची संधी मिळाली. कामिंदू मेंडिस हा श्रीलंकेचा फिरकी अष्टपैलू खेळाडू आहे. ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आपल्या कामगिरीची छाप पाडली आहे. कामिंदू मेंडिसने या पहिल्या सामन्यात इतिहास घडवला.
पॅट कमिन्सने १३व्या षटकात कमिंदू मेंडिसकडे चेंडू सोपवला आणि येताच या खेळाडूने आश्चर्यकारक कामगिरी केली. या खेळाडूने वेंकटेश अय्यरला उजव्या हाताने गोलंदाजी केली कारण तो डावखुरा फलंदाज होता आणि कामिंदू मेंडिसने उजव्या हाताने फलंदाजी करत असलेल्या अंगक्रिश रघुवंशीला डाव्या हाताने गोलंदाजी केली.
कामिंदू मेंडिसने पहिल्याच षटकात आश्चर्यकारक कामगिरी केली. या खेळाडूने आयपीएल कारकिर्दीतील तिसऱ्या चेंडूवर विकेट घेतली. मेंडिसने अर्धशतक झळकावल्यानंतर खेळत असलेल्या अंगक्रिश रघुवंशीची विकेट घेतली. कामिंदूने एका षटकात ४ धावा देत संघाला मोठी विकेट मिळवून दिली. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कर्णधार पॅट कमिन्सने त्याला पुन्हा गोलंदाजीची संधी दिली नाही. यावेळी सनरायझर्स हैदराबादने कामिंदू मेंडिसला संघात सामील केलं. SRH ने फक्त ७५ लाख रुपये खर्चून त्याला संघात घेतले.
हैदराबादच्या गोलंदाजांची केकेआरच्या फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना २०० धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्सने ४ षटकांत ४४ धावा दिल्या. सिमरजीत सिंगने ४७ धावा दिल्या. हर्षल पटेलने ४ षटकांत ४३ धावा देत १ विकेट घेतली. मोहम्मद शमीने ४ षटकांत २९ धावा देत एक विकेट घेतली.
कोलकाताची सुरुवात खूपच खराब झाली. डी कॉक एक धाव काढून बाद झाला. सुनील नरेनने केवळ ७ धावा केल्या होत्या. मात्र यानंतर अंगक्रिश रघुवंशीने ५० धावा आणि व्यंकटेश अय्यरने २९ चेंडूत ६० धावा करत कोलकाता संघाचे अप्रतिम पुनरागमन केले. कर्णधार अजिंक्य रहाणेनेही ३८ धावांची खेळी केली. शेवटी रिंकू सिंगने १७ चेंडूत नाबाद ३२ धावा केल्या.