KL Rahul Angry Conversation With LSG Owner Video: लखनौ सुपर जायंट्सचे सहाय्यक प्रशिक्षक लान्स क्लुसनर यांनी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार केएल राहुलवर फ्रँचायझी मालक संजीव गोयंका का भडकले होते याबाबत अखेरीस खुलासा केला आहे. गोयंका राहुलशी चिडून बोलत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होता ज्यावरून अनेकांनी राहुलची बाजू घेत “तू हा संघ सोडून आरसीबी मध्ये जा तुझा नक्कीच तिथे आदर करतील” असेही सल्ले त्याला दिले गेले. राहुल किंवा संघमालक कुणीही या वादावर विशेष स्पष्टीकरण दिले नसले तरी ऑनलाईन चर्चेमुळे हे प्रकरण आणखी चिघळत होते. अशावेळी आता लखनौ सुपर जायंट्सचे सहाय्यक प्रशिक्षक लान्स क्लुसनर यांनी या वादावर मौन सोडून गोयंका यांची बाजू प्रेक्षकांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाद झाला की चर्चा?

सामनापूर्व परिषदेत सांगताना क्लुसनर म्हणाले की, “दोन क्रिकेट प्रेमींमधील चर्चेमध्ये मला कोणतीही अडचण दिसत नाही. त्यामुळे आमच्यासाठी हे फक्त चहाच्या कपातील वादळ आहे असे मला वाटते. आम्हाला उत्साहाने, ऊर्जेने केलेली चर्चा आवडते. मला वाटतं की अशा प्रकारे संघ चांगले होतात. आमच्यासाठी ही फार मोठी गोष्ट नाही.”

दुसरीकडे, या वादाच्या व्हिडीओनंतर काही अहवालांमध्ये असेही सुचवण्यात आले होते की एलएसजी राहुलला पुढील हंगामासाठी कायम ठेवणार नाही परंतु क्लुसनर यांनी या अफवांचे खंडन केले आणि सांगितले की याबाबत निश्चितपणे कोणतीही चर्चा झालेली नाही.

राहुलच्या खेळीबाबत प्रशिक्षकांचं विश्लेषण

दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगच्या चालू हंगामात सुस्त प्रदर्शनानंतर के एल राहुलची २०२४ च्या टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघातही निवड झालेली नाही. राहुल या हंगामात एलएसजीसाठी सलामीवीर म्हणून खेळत असून त्याने आतापर्यंत ४६० धावा केल्या आहेत. पण त्याचा १३६.०९ हा स्ट्राइक रेट त्याच्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. क्लुसनरने राहुलच्या स्ट्राईक रेटबाबत भाष्य करताना नमूद केले की, राहुल हा फलंदाजी करताना विकेट राखून ठेवण्याचा प्रयत्न करतो ज्यामुळे समोरच्या खेळाडूला बेधडक खेळण्याची संधी मिळते.

के. एल राहुलला पाठिंबाच नाही!

क्लुसनर पुढे असंही म्हणाले की, “केएलची स्वतःची खास शैली आहे ज्यामुळे तो एक उत्कृष्ट खेळाडू बनला आहे आणि जगभरात त्याचा आदर केला गेला आहे. मला वाटते की हे आयपीएल त्याच्यासाठी अत्यंत कठीण आहे कारण आम्ही टप्प्याटप्प्याने सामने गमावत राहिलो ज्यामुळे त्याला कुठे हातपाय मारण्याची संधी मिळाली नाही. शिवाय त्याला साथ देण्यासाठी एक भक्कम बॅटिंग युनिट संघात निर्माण झाले नाही जी मोठी समस्या आहे. आम्ही अगदी मोक्याच्या क्षणी अनेकदा विकेट्स गमावल्या आहेत. यावर चर्चा झालीये निर्णयही लवकरच होईल.”

हे ही वाचा << “रोहित शर्मा पुढचं IPL मुंबईकडून खेळणार नाही, त्याऐवजी..”, म्हणत वसीम अक्रमने वर्तवलं हिटमॅनचं भविष्य

आयपीएल प्लेऑफ व पॉईंट टेबल

दरम्यान, आयपीएलचा अंतिम सामना आता हळुहळू जवळ येत आहे. प्ले ऑफची गणिते अजूनही स्पष्ट झालेली नाहीत. अर्थात कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्स पॉईंट टेबलच्या टॉपला असल्याने प्लेऑफ मध्ये जाणार हे जवळपास निश्चित आहे पण चौथ्या जागेसाठी लढाई अजूनही कायम आहे. सनरायजर्स हैदराबाद व आरसीबी सध्या प्रत्येकी १२ पॉईंट्ससह अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी आहे. अचानकपणे सुधारलेला आरसीबीचा फॉर्म पाहता प्लेऑफ गाठण्याची संधी विराटच्या संघाकडे सुद्धा आहे असे दिसतेय.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kl rahul angry chats with lsg owner sanjiv goenka video coach klusener explains why rahul does not get support in lsg batting ipl point table svs
Show comments