KL Rahul Ignored Sanjeev Goenka Viral Video : केएल राहुल आपल्या जुन्या संघाविरुद्ध पहिल्यांदाच खेळण्यासाठी मैदानात उतरला. त्यामुळे तो कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. आपल्या जुन्या होम ग्राउंडवर खेळताना केएल राहुलची बॅट चांगलीच तळपली. धावांचा पाठलाग करताना तो शेवटपर्यंत उभा राहिला आणि षटकार मारून दिल्लीला विजय मिळवून दिला. दरम्यान या सामन्यानंतर संजीव गोयंका यांनी केएल राहुलचं अभिनंदन केलं, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
गोयंका अभिनंदन करण्यासाठी मैदानात आले, पण…
केएल राहुल गेल्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार होता. मात्र संघाच्या फ्लॉप कामगिरीनंतर संजीव गोयंका केएल राहुलवर संताप व्यक्त करताना दिसून आले होते. त्यामुळे केएल राहुलने या संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. मेगा ऑक्शनमध्ये त्याला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात स्थान दिलं. या हंगामात तो दिल्ली कॅपिटल्स संघासाठी एक्स फॅक्टर ठरतोय.
यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात केएल राहुलने ९३ धावांची शानदार खेळी करून संघाला विजय मिळवून दिला होता. आता लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने शानदार अर्धशतकी खेळी केली आणि षटकार मारून संघाला ८ गडी राखून विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यात संजीव गोयंका मैदानात येऊन केएल राहुलचं अभिनंदन करताना दिसून येत आहे. मात्र केएल राहुल थांबलाच नाही. राहुल हात मिळवून पुढे निघून गेला.
केएल राहुलच्या ५००० धावा पूर्ण
या सामन्यात केएल राहुलने आणखी एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. केएल राहुल हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वात जलद ५००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे. हा कारनामा त्याने १३० व्या डावात केला आहे. यापूर्वी डेव्हिड वॉर्नरने हा कारनामा १३५ व्या डावात केला होता. तर विराट कोहलीने १५७ आणि एबी डिव्हिलियर्सने हा कारनामा १६१ व्या डावात केला होता.