KL Rahul to quit LSG Team : आयपीएल २०२४ मध्ये बुधवारी एलएसजी आणि एसआरएच यांच्यात सामना झाला. या सामन्यात लखनऊला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. लखनऊने फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करताना केवळ १६५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हैदराबादने १० षटकांत १० गडी राखून सामना जिंकला. सामन्यानंतर एलएसजीचे मालक संजीव गोयंका कर्णधार केएल राहुलशी वेगळ्याच स्वरात बोलताना दिसले. त्यामुळे केएल राहुल एलएसजीपासून वेगळा होईल किंवा संजीव गोयंका त्याला पुढील हंगामासाठी रिटेन करणार नाहीत, याबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चर्चेवरुन असे वाटते की पुढील हंगामात संघाची धुरा एका नव्या कर्णधाराच्या खांद्यावर दिसू शकते.
लखनऊची हैदराबादविरुद्धची कामगिरी पाहता संघमालक नक्कीच नाखूश असेल, पण राहुलने ज्या पद्धतीने मैदानावर कर्णधाराविषयीची निराशा सर्वांसमोर व्यक्त केली. त्यामुळे त्याचे चाहते खूपच नाराज झाले आहेत. केएल राहुल आणि सर्व क्रिकेट चाहते संजीव गोयंका यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. त्यामुळे आता केएल राहुलवर लखनऊ सुपर जायंट्सची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. केएल राहुल आतापर्यंत आयपीएलमध्ये हैदराबाद, बंगळुरू आणि पंजाब संघाकडून खेळला आहे. यादरम्यान तो कुठेही स्थिरावला झाला नाही. विशेष म्हणजे यंदा होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेसाठी टीम इंडियात त्याची निवड करण्यात आली नाही.
एलएसजीचा भावी कर्णधार कोण?
आता केएल राहुल एलएसजीपासून वेगळे होणार का हा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, हे तेच संजीव गोयंका आहेत, ज्यांनी यापूर्वी पुणे रायझिंग सुपर जायंट्ससोबत दोन वर्षे आयपीएलमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी एमएस धोनीला आपल्या संघाचा कर्णधार बनवले, परंतु एका खराब हंगामानंतर त्यांनी धोनीसारख्या खेळाडूला कर्णधारपदावरून काढून स्टीव्ह स्मिथला कर्णधार बनवले, परंतु त्यानंतरही ते विजेतेपद मिळवू शकले नाहीत. संजीव यावेळीही असे काही करणार का? असे झाले तर संघाची कमान निकोलस पूरन किंवा क्रुणाल पंड्या सांभाळू शकतात.
हेही वाचा – IPL 2024 : केएल राहुलवर संतापणारे LSG संघाचे मालक संजीव गोयंका यांची नेट वर्थ किती आहे? जाणून घ्या
लखनऊ पुढील सामने कसे खेळणार हा मोठा प्रश्न –
लखनऊ सुपर जायंट्स संघाची प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता अजूनही आहे. पण राहुलला ज्या पद्धतीने वागणूक मिळाली, त्यामुळे तेही कलंकित होत आहेत. कारण जो व्हिडीओ सर्वांनी पाहिला आहे, तो इतर एलएसजी खेळाडूंनी पाहिला नसेल असे तुम्हाला वाटते का? बघितले असेल तर इतर खेळाडूंचे मनोबल किती घसरले असेल याची कल्पना करणे कदाचित अवघड आहे. अशा परिस्थितीत एलएसजी पुढे जाईल अशी आशा करणे निरर्थक ठरेल. आता संघाची कामगिरी कशी होते आणि त्यानंतर पुढच्या वर्षी आयपीएल होईल तेव्हा या संघात किती बदल होणार हे पाहणे बाकी आहे.
हेही वाचा – IPL 2024 : राहुलच नाही तर रॉस टेलरही संघ मालकाच्या रोषाचा ठरलाय बळी, शून्यावर आऊट झाल्यानंतर उचलला होता हात
आयपीएल २०२४ मधील केएल राहुलची कामगिरी –
आयपीएल २०२४ मधील केएल राहुलच्या कामगिरीबद्दल बोलायचे, तर त्याने या हंगामात त्याच्या संघासाठी खेळलेल्या १२ सामन्यांच्या १२ डावांमध्ये सर्वाधिक ४६० धावा केल्या आहेत. केएल राहुलचा स्ट्राईक रेट आतापर्यंत १३६.०९ आहे तर त्याची सरासरी ३८.३३ आहे. या हंगामात त्याने ३ अर्धशतके झळकावली आहेत. या दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या ८३ धावा आहे.