आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २४ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार के एल राहुलने तुफानी फलंदाजी केली. त्याने अवघ्या ५८ चेंडूंमध्ये धडाकेबाज शतक झळकावले आहे. त्याच्या या खेळामुळेच लखनऊ सुपर जायंट्सने मुंबईसमोर १९९ धावांचा डोंगर उभा केला आहे. केएल राहुलच्या या धडकेबाज शतकाची तसेच शतक झळकावल्यानंतर त्याने केलेल्या खास सेलिब्रेशनची चांगलीच चर्चा होत आहे. शतक झळकावल्यानंतर राहुलने आपल्या हाताने कान बंद केले आहेत.

केएल राहुलने झळकावले धमाकेदार शतक

केएल राहुल याआधीच्या सामन्यात शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर या सामन्यात तो काय कमाल करुन दाखवणार असे विचारल जात होते. मात्र त्याने धडाकेबाज कामगिरी करत नाबाद १०३ धावांची शतकी खेळी केली आहे. त्याने अवघ्या ६० चेंडूंमध्ये पाच षटकार आणि ९ चौकार यांच्या मदतीने १०३ धावा केल्या आहेत. त्याच्या खास फलंदाजीमुळेच लखनऊ सुपर जायंट्स संघ १९९ धावांपर्यंत पोहोचू शकला.

शतक झळकावल्यानंतर राहुल कान का बंद करतो ?

केएल राहुलने या सामन्यात शतक झळकावले. १०० धावा पूर्ण होताच त्याने कान बंद केले. याआधीही केएल राहुलने अनेकवेळा अशाच प्रकारे सेलिब्रेशन केलेले आहे. प्रसिद्ध फुटबॉलपटू अयोज पेरेझ हादेखील अशाच प्रकारे सेलिब्रेशन करतो. शतक झळकावल्यानंतर राहुलने हेल्मेट तसेच बॅट मैदानावर ठेवली. तसेच त्याने हात कानांवर ठेवून डोळे बंद केले. त्याचे हे खास सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरले. अशा प्रकारे सेलिब्रेशन करण्याचे नेमके कारण काय ? असे राहुलला यापूर्वी विचारण्यात आले होते. मात्र त्यावेळी त्याने हे एक गूढ राहू द्या म्हणत विषय टाळला होता.

गोंगाट कमी व्हावा म्हणून कान बंद करतो

पुढे इंग्लंड विरोधात एकदिवसीय सामन्यात शतक झळकावल्यानंतर त्याने या खास सेलिब्रेशनचे कारण सांगितले होते. “बाहेरचा गोंगाट कमी करण्यासाठी मी हे असे करतो. असे करताना कोणाचाही अनादर करण्याचा हेतू नसतो. मात्र बाहेर काही लोक आपल्यावर टीका करणारे असतात. ते आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे बाहेरचा गोंधळ कमी व्हावा म्हणून मी कान बंद करतो,” असे केएल राहुल म्हणाला होता.

दरम्यान, केएल राहुलच्या लखनऊने मुंबईसमोर १९९ धावांचे डोंगर उभा केला. मुंबईला जिंकण्यासाठी २०० धावा कराव्या लागणार आहेत.

Story img Loader