Mumbai Indians vs Lucknow Super Giants Highlights: लखनऊ सुपर जायंट्स संघाने इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये विजयासह सांगता केली. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाने १८ धावांनी विजय मिळवला. मात्र, या मोसमात १४ गुण असूनही लखनऊला प्लेऑफसाठी पात्रता मिळवता आली नाही. सामना संपल्यानंतर विजयाच्या आनंदासोबतच राहुलच्या चेहऱ्यावर प्लेऑफमध्ये न पोहोचल्याची खंतही स्पष्ट दिसत होती. सामन्यानंतर केएल राहुलनेही विनोदी पद्धतीने टी-२० विश्वचषकाबाबत आपले मत व्यक्त केले.

सामन्यानंतर बोलताना राहुलने हसत हसत एका प्रसिद्ध जाहिरातीचा उल्लेख केला आणि त्याचे सासरे सुनील शेट्टी आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्यावर मजेशीर टिपण्णी केली. आयपीएल सुरू होण्याच्या वेळेस रोहित शर्मा, केएल राहुल आणि त्याचे सासरे सुनील शेट्टी यांची एक जाहिरात आली होती. ज्यात सुनील शेट्टीने मुंबईचे असल्याने मुंबईच्या संघाला आणि शर्माजींच्या मुलाला पाठिंबा देणार असे म्हटले. या जाहिरातीवरूनच केएल राहुल म्हणाला, “आता मी माझ्या सासऱ्यांच्या टीममध्ये आहे. आगामी विश्वचषकात आम्ही दोघे मिळून शर्माजींच्या मुलाला सपोर्ट करू.”

आयपीएलच्या १७व्या हंगामाबाबत राहुल म्हणाला, “हा हंगाम खूप निराशाजनक होता. हंगामाच्या सुरुवातीला मला वाटले की आमचा संघ खूप मजबूत आहे. होय, काही खेळाडूंनी दुखापत झाली, जे प्रत्येक संघासोबत घडते. पण आम्ही एक संघ म्हणून चांगली कामगिरी केली नाही. आजचा सामना खूप छान झाला. अशाप्रकारेच आम्ही खेळलं पाहिजे होतं.”

राहुलने भारतीय संघातील वेगवान गोलंदाजांचे कौतुक केले. त्याने सांगितले की फ्रँचायझीने त्यांच्या प्रशिक्षणावर खूप लक्ष दिले आहे. “त्याच्यासाठी खूप आनंद झाला,” तो म्हणाला. फ्रँचायझीने त्यांच्यावर खूप मेहनत घेतली आहे. ही केवळ दोन महिन्यांची बाब नाही. आम्ही मयंक आणि युधवीरला दक्षिण आफ्रिकेला मॉर्नी मॉर्केलसोबत प्रशिक्षणासाठी पाठवले. त्याची मेहनत फळाला आली आहे.”

केएल राहुलने टीम इंडियात पुनरागमन करण्याबाबत सांगितले. तो म्हणाला, “आता टी-२० क्रिकेट जास्त नाहीय. या हंगामात मी माझ्या फलंदाजीबद्दल खूप काही शिकलो आहे. संघात परत येण्यासाठी मला काय करावे लागेल, कदाचित मधल्या फळीत खेळावे लागेल, किंवा नाही.”

पुढे संघाबाबत बोलताना म्हणाला, “निकोलस पूरनने वरच्या क्रमांकावर फलंदाजी करावी अशी आमची इच्छा होती, पण संघाकडे पाहता आमच्या अनुभवी विदेशी खेळाडूंनी दडपण हाताळावे अशी आमची इच्छा होती. आमच्या दोन विदेशी खेळाडूंनी एकत्र फलंदाजी करू नये, असे मला वाटत होते.”

एलएसजीने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना २१४ धावा केल्या. ज्यामध्ये केएल राहुलने ५५ धावा तर सामनावीर ठरलेल्या निकोलस पुरनने २९ चेंडूत ८ षटकार आणि ५ चौकारांसह सर्वाधिक ७५ धावा केल्या. त्याच्या या वादळी खेळीसह लखनऊने मोठी धावसंख्या उभारली. तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या मुंबईला १९६ धावांवर समाधान मानावे लागले. रोहित शर्मा (६८) आणि नमन धीर (६२) यांची खेळी व्यर्थ ठरली.

Story img Loader