Ambati Rayudu Announced Retirement Of IPL : चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी फलंदाज आणि टीम इंडियासाठी खेळलेल्या अंबाती रायुडूने आयपीएलमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात टायटन्सविरोधात होणाऱ्या फायनल सामन्यानंतर निवृत्त होणार असल्याचं रायुडून जाहीर केलं आहे. गुजरात विरुद्ध होणारा फायनलचा सामना त्याच्या करिअरमधील शेवटचा सामना असणार आहे. ३८ वर्षांच्या अंबातीने भारतासाठी ५५ वनडे आणि ६ टी-२० सामने खेळले आहेत. तर आयपीएलमध्ये या फायनलआधी रायुडूने २०३ सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये रायुडूने २८.२९ च्या सरासरीनं ४३२९ धावा कुटल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
रायुडूने पोस्ट केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं, आयपीएलमध्ये चेन्नई आणि मुंबई हे दोन महान संघ, २०४ सामने, १४ सीजन, ११ प्ले ऑफ, ८ फायनल, ५ ट्रॉफी, आज सहावी ट्रॉफी जिंकेल, अशी आशा आहे. आयपीएल २०२३ ची फायनल माझ्यासाठी शेवटचा सामना असेल, असा मी निर्णय घेतला आहे. मी या महान टूर्नामेंटमध्ये खेळायचा आनंद लुटला. सर्वाचं आभार, नो यू टर्न…यानंतर रायुडूने स्माईलीचा इमोजी जोडला, कारण रायुडूने खूप आधी निवृत्ती घोषीत केली होती. पण त्यानंतर त्याने क्रिकेटमध्ये पुन्हा पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला होता.
आयपीएलमध्ये किती कमाई केली?
अंबाती रायुडू मुंबई इंडियन्स संघासोबत २०१० मध्ये १२ लाख रुपयांच्या किंमतीवर जोडला गेला होता. परंतु, त्यानंतरच्या पुढील वर्षी त्याला ३० लाख रुपयांत खरेदी केलं. त्यानंतर २०१४ मध्ये मुंबई इंडियन्सने रायुडूला वर्षाला ४ कोटी रुपये दिले. पण आता रायुडू चेन्नईसाठी वर्षाला ५ कोटी २५ लाख रुपयांत खेळत आहे. आयपीएलमध्ये रायुडूने आतापर्यंत जवळपास ३८ कोटी ३२ लाख रूपयांची कमाई केली आहे.