Team India Strength and weakness : अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआय निवड समितीने टी-२० विश्वचषकासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय या स्पर्धेत सहभागी होणार आहे. भारतीय संघात निवड झालेल्या खेळाडूंमध्ये काही युवा आहेत, तर काही अनुभवी खेळाडू आहेत. तसेच काही अशा खेळाडूंनाही संघात स्थान मिळाले आहे, ज्यांची अलीकडची कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. रोहित शर्मासमोर अनेक मोठी आव्हाने असणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघाची ताकद आणि कमकुवतपणा काय आहे? जाणून घेऊया.
भारतीय संघाची ताकद –
वेगवान गोलंदाजीत भारताकडे जसप्रीत बुमराह आहे, जो सध्या अत्यंत घातक फॉर्ममध्ये आहे आणि कदाचित जागतिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज आहे. याशिवाय कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांची जोडी परतली आहे, जी जागतिक क्रिकेटमधील सर्वात घातक फिरकी जोडींपैकी एक आहे. टी-२० फॉरमॅटचा नंबर वन फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतीतून बरा होऊन परतला आहे. सूर्या हा असा फलंदाज आहे जो एकटा स्वबळावर जिंकवून देऊ शकतो. विराट कोहलीही चांगल्या स्ट्राईक रेटसह (१४७) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सध्याच्या आयपीएलमध्ये त्याने शतकासह ५०० धावा पूर्ण केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा स्वतः एक स्फोटक फलंदाज आहे. त्याची बॅट चालली तर जगातील महान गोलंदाजही त्याच्यापुढे गुडघे टेकताना दिसतात.
भारतीय संघाची कमकुवतता –
ऑस्ट्रेलियासारख्या संघांप्रमाणेच भारताकडे अष्टपैलू आणि एक्स-फॅक्टर खेळाडूंची कमतरता आहे. संघाकडे हार्दिक पंड्याच्या रूपाने एकच वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे, जो सध्या अतिशय खराब फॉर्ममध्ये आहे. त्याच्या बॅटमधून ना धावा येत आहेत ना तो चेंडूने काही खास पराक्रम करु शकला आहे. आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना तो आतापर्यंत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. संघात बुमराहला सोडून मोहम्मद सिराज सर्वोत्तम गोलंदाजी करत नाही. आयपीएल २०२४ मध्ये तो विकेट घेण्यात यशस्वी ठरला नाही आणि खूप धावाही देत आहे. अर्शदीप सिंगचीही तीच अवस्था आहे. विशेषत: डेथ ओव्हर्समध्ये तो अनेकदा धावा देताना दिसत आहे. त्यामुळे टीम इंडियाला दुखापतग्रस्त मोहम्मद शमीची खूप उणीव भासणार आहे, ज्याने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात शानदार गोलंदाजी करून संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
हेही वाचा – VIDEO : बॅट क्रिझच्या आत असूनही आयुष बडोनी कसा झाला धावबाद? चाहत्यांनी उपस्थित केला प्रश्न
भारताला विश्वचषकावर नाव कोरण्याची दुसरी संधी –
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारताने एकदिवसीय विश्वचषक आपल्याच होस्टिंगमध्ये खेळताना गमावला होता. या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत भारताने आपला दबदबा कायम राखला होता, मात्र विजेतेपदाच्या लढतीत रोहित शर्माच्या संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. आता संघाला दुसरा टी-२० विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. २००७ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला टी-२० विश्वचषक जिंकला होता. १ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या यजमानपदाखाली ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
रोहितवर महत्त्वाची जबाबदारी –
कर्णधार रोहित शर्माच्या खांद्यावर संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी तर असेलच, पण संघाला सलामी देऊन प्रत्येक सामन्यात चांगली सुरुवात करून देण्याचीही जबाबदारी त्याच्यावर असेल. सध्याच्या आयपीएल मोसमात रोहितने शतक निश्चित झळकावले आहे. त्यानंतर उर्वरित सामन्यांमध्ये तो संघर्ष करताना दिसत आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी त्याची बॅट चालणे तितकेच महत्त्वाची आहे.