भारतीय कर्णधार विराट कोहली हा सध्या एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने म्हटले आहे.

येत्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) हंगामात कोहली आणि स्मिथ या जागतिक क्रिकेटमधील दोन सर्वोत्तम फलंदाजांची लढत पाहायला मिळेल. याशिवाय वर्षांच्या उत्तरार्धात होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतही चाहत्यांना या दोघांच्या फलंदाजीचा आनंद लुटता येईल. जगातील सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज कोण? हा प्रश्न ३१ वर्षीय स्मिथला विचारला असता त्याने त्वरित ‘‘कोहली’’ हे उत्तर दिले.

सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये एकदिवसीय प्रकारात कोहलीच्या नावावर ५९.३४च्या सरासरीने ११,८६७ धावा जमा आहेत. याशिवाय त्याने ४३ शतके झळकावली असून, सर्वाधिक एकदिवसीय शतके झळकावणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमापासून तो सात शतकांच्या अंतरावर आहे.

भारताच्या के. एल. राहुल आणि संजू सॅमसन यांच्या कामगिरीकडे सर्वाचे विशेष लक्ष असेल, असे राजस्थान रॉयल्सच्या स्मिथने सांगितले.