भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या उग्र वागण्यावर नियंत्रण ठेवता येईल असा कठोर प्रशिक्षक बीसीसीआयने नियुक्त करावा असे मत माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी व्यक्त केले. मैदानात भावनांवर नियंत्रण ठेवणे कोहलीला जमत नाही. यामुळे अनेक वादांना देखील कोहलीला आजवर सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे कोहलीच्या भावनांवर अंकुश ठेवणारा प्रशिक्षक टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात यावा असे बिशनसिंग बेदी म्हणाले. कोहली भावनावश खेळाडू आहे मात्र असे राहून चालणार नाही. त्याला आपल्या वागण्यात बदल करावाच लागेल. क्रिकेट हा कबड्डी किंवा खो-खो सारखा खेळ नाही. जर, तुम्हाला दीर्घकाळ खेळायचे असेल तर भावनांवर नियंत्रण ठेवावेच लागेल, असेही बेदी पुढे म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी आयपीएल स्पर्धेवर देखील निशाणा साधला. आयपीएलमुळेच खेळाडूंच्या गुणवत्तेला धोका पोहोचत असल्याचे ते म्हणाले. आयपीएलमुळे आज अनेक चांगले आणि गुणवाण खेळाडूंचे व्हिजन भरकटले आहे. मनन वोहरा, उन्मुक्त चंद, संजू सॅमसन यांच्यासारखे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील खेळाडू आज आयपीएलमुळे गोंधळून गेले आहेत. युवा खेळाडूंकडून प्रथम श्रेणी क्रिकेट जास्तीत जास्त कसे खेळवून घेता येईल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही बेदी पुढे म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा