Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Highlights: आयपीएल २०२५ स्पर्धेतील ४८ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी अतिशय महत्वाचा होता. कारण प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सला हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकायचा होता. या सामन्यात सुनील नरेन दिल्लीच्या खेळाडूंवर भारी पडला. हा सामना कोलकाताने १४ धावांनी आपल्या नावावर केला आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने या सामन्यातील पहिल्या डावात २०४ धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सला हा सामना जिंकण्यासाठी २०५ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. अभिषेक पॉरेल ४ धावांवर तंबूत परतला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला करूण नायरही फार काळ टिकू शकला नाही. तो अवघ्या १५ धावांवर तंबूत परतला. या डावात फाफ डू प्लेसिसची बॅट चांगलीच तळपली, त्याने या डावात ४५ चेंडूंचा सामना करत ७ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने ६२ धावांची खेळी केली. या डावात केएल राहुलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, संघाला गरज असताना, तो अवघ्या ७ धावांवर बाद होऊन माघारी परतला.

कर्णधार अक्षर पटेलने दिल्लीला विजय मिळवून देण्यात पूर्ण जोर लावला. त्याने गोलंदाजी करताना २ गडी बाद केले. तर फलंदाजी करताना ४३ धावा चोपल्या. शेवटी आशुतोष शर्मा आणि विपराज निगमने जोर लावला. मात्र, ते संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.

कोलकाताने उभारला २०४ धावांचा डोंगर

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताकडून डावाची सुरूवात करताना रहमानुल्लाह गुरबाजने २६ धावांची खेळी केली. तर सुनील नरेनने २७ धावा चोपल्या. अजिंक्य रहाणेने २६ धावांची खेळी केली. अंगकृश रघुवंशीने ४४ धावा चोपल्या. शेवटी रिंकू सिंगने ३६ धावा चोपल्या. यासह कोलकाता नाईट रायडर्सने ९ गडी बाद २०४ धावांचा डोंगर उभारला.

केकेआरचं स्पर्धेतील आव्हान कायम

कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचा होता. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी कोलकाताला हा सामना जिंकायचा होता. दिल्लीला पराभूत करून कोलकाताने ९ गुणांची कमाई केली आहे. यासह कोलकाताचा संघ सातव्या स्थानी कायम आहे.