इडन गार्डन्सच्या घरच्या मैदानावर कामगिरी बहरते हे सिद्ध करत कोलकाता नाइट रायडर्स संघाने सनरायझर्स हैदराबादवर सहज विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने १६७ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना हैदराबादने पहिल्याच षटकांत डेव्हिड वॉर्नरला गमावले. त्यानंतर जिंकण्याची कोणतीही जिद्द न दाखवता हैदराबादने विकेट्स गमावल्या आणि कोलकाताने आरामात विजय साकारला.
उमेश यादवच्या भेदक गोलंदाजीवर वॉर्नर त्रिफळाचीत झाला. त्याने ४ धावा केल्या. त्याच षटकात नमन ओझाला बाद करत उमेशने हैदराबादला अडचणीत टाकले. १५ धावा करून शिखर धवन ब्रॅड हॉगची शिकार ठरला. अनुभवी ईऑन मॉर्गन ५ धावांवर परतला. पीयूष चावलाने हनुमा विहारीने बाद केले. लक्ष्य गाठण्यासाठी कोणताही संघर्ष न करता हैदराबादने नांगी टाकली. मॉइझेस हेन्रिकेने ४१ धावांची खेळी केली. करण शर्माने ३ षटकारांच्या साह्य़ाने ३२ धावा फटकावत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. हैदराबादने ९ बाद १३२ धावा केल्या आणि कोलकाताने ३५ धावांनी विजय मिळवला. कोलकातातर्फे उमेश यादव आणि ब्रॅड हॉग यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
तत्पूर्वी एकत्रित प्रयत्नांच्या बळावर कोलकाताने १६७ धावा केल्या. गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा यांनी ५७ धावांची सलामी दिली. गंभीरपाठोपाठ उथप्पाही तंबूत परतला. आंद्रे रसेल व रायन टेन डुशाटा झटपट बाद झाले. मात्र, मनीष पांडेने संयमी खेळी केली. त्याने ३३ धावा केल्या. युसुफ पठाणने १९ चेंडूत ४ चौकारांसह ३० धावा केल्याने कोलकाताला दीडशेचा टप्पा ओलांडता आला.
संक्षिप्त धावफलक : कोलकाता नाइट रायडर्स : ७ बाद १६७ (मनीष पांडे ३३, गौतम गंभीर ३१, करण शर्मा २/२९) विजयी विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद : ९ बाद १३२ (मॉइझेस हेन्रिके ४१, करण शर्मा ३२, उमेश यादव २/३४, ब्रॅड हॉग २/१७) सामनावीर : उमेश यादव
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा