CSK VS KKR IPL 2025: नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने चेन्नईला चेपॉकवर अवघ्या १०३ धावांतच रोखलं. त्यानंतर अवघ्या १०.१ षटकात हे लक्ष्य पार करत कोलकाताने चेन्नईच्या चिंधड्या उडवल्या. कोलकाताने ८ विकेट्स आणि ५९ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला.
ऋतुराज गायकवाड कोपऱ्याच्या दुखापतीमुळे उर्वरित हंगाम खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झाल्यामुळे महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद स्वीकारलं. मात्र धोनीचं नेतृत्वही चेन्नईचं नशीब बदलू शकलं नाही. चेन्नईने या लढतीसाठी राहुल त्रिपाठी आणि अंशुल कंबोज यांना संधी दिली. मात्र हे बदलही चेन्नईचं नशीब बदलू शकले नाहीत.
डेव्हॉन कॉनवे-रचीन रवींद्र जोडीने सावध सुरुवात केली. मात्र चेन्नईच्या १६ धावा असताना ते दोघेही बाद झाले. यानंतर विजय शंकर आणि राहुल त्रिपाठी यांची जोडी जमली. विजय शंकरला दोन जीवदानंही मिळाली. वरुण चक्रवर्तीने विजय शंकरला बाद केलं तर सुनील नरिनने राहुलला त्रिफळाचीत केलं. यानंतर चेन्नईच्या फलंदाजांनी सपशेल लोटांगण घातलं. रवीचंद्रन अश्विन (१), रवींद्र जडेजा (०), इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेला दीपक हुड्डा (०) यांनी निराशाच केली. महेंद्रसिंग धोनीकडून चाहत्यांना अपेक्षा होत्या पण तोही नरिनच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. धोनीने एका धावेचं योगदान दिलं. शिवम दुबेने एकाकी लढा देत नाबाद ३१ धावांची खेळी केली. दुबेच्या खेळीमुळे चेन्नईने कशीबशी शंभरी पार केली. कोलकातातर्फे नरिनने १३ धावांत ३ तर हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या.
१०४ धावांच्या लक्ष्यासमोर खेळताना क्विंटन डी कॉक आणि सुनील नरिन यांनी ४६ धावांची खणखणीत सलामी दिली. चेन्नईतर्फे पदार्पण करणाऱ्या अंशुल कंबोजने क्विंटनला बाद करत ही जोडी फोडली. क्विंटनने १६ चेंडूत २३ धावा केल्या. नूर अहमदने नरिनला त्रिफळाचीत केलं. नरिनने १८ चेंडूत २ चौकार आणि ५ षटकारांसह ४४ धावांची वेगवान खेळी केली. अजिंक्य रहाणे आणि रिंकू सिंगने कोलकाताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. रहाणेने १७ चेंडूत २० तर रिंकूने १२ चेंडूत १५ धावांची खेळी केली.