* सनरायजर्स हैदराबादवर ४८ धावांनी दणदणीत विजय
* गौतम गंभीरचे दमदार अर्धशतक
* जॅक कॅलिसची अष्टपैलू चुणूक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात दिल्लीच्याच विराट कोहलीशी मैदानावर हुज्जत घालणाऱ्या गौतम गंभीरने आपला आक्रमकपणा सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात लाजवाब फलंदाजीने सादर केला. कर्णधार गंभीरची घणाघाती अर्धशतकी खेळी आणि जॅक कॅलिसची अष्टपैलू चुणूक या बळावर गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सने हैदराबादचा ४८ धावांनी दणदणीत पराभव केला. कोलकाताने आयपीएलच्या सहाव्या पर्वात आपला दुसरा विजय नोंदवला, तर हैदराबादच्या खात्यावर दुसरा पराभव जमा झाला.
कप्तान गौतम गंभीर, ईऑन मॉर्गन आणि जॅक कॅलिसच्या चौफेर फटकेबाजीच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १८० अशी विशाल धावसंख्या उभारली. परंतु हैदराबादच्या फलंदाजांना तो कित्ता गिरवता आला नाही. कोलकात्याच्या गोलंदाजांनी त्यांना निर्धारित षटकांत ७ बाद १३२ धावसंख्येवर रोखले. कॅलिसने फलंदाजीत आपले कर्तृत्व दाखविल्यानंतर टिच्चून गोलंदाजी करीत ४ षटकांत फक्त १३ धावांत हैदराबादचे तीन मोहरे बाद केले.
हैदराबादच्या पार्थिव पटेल (२७) आणि कॅमेरून व्हाइट (३४) यांनी ५७ धावांची दमदार सलामी नोंदवली. त्यानंतर कोलकात्याच्या गोलंदाजांनी सामन्यावर नियंत्रण घेतले. थिसारा परेराने २५ चेंडूंत ३६ धावांची झुंजार खेळी केली.
त्याआधी, कोलकात्याच्या नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. गंभीरने ४५ चेंडूंत ५३ धावा काढताना सहा चौकार आणि एक उत्तुंग षटकार खेचला. तसेच मॉर्गनने २१ चेंडूंत ४७ धावांची खेळी साकारताना पाच चौकार आणि तीन षटकारांची आतषबाजी केली.
जॅक कॅलिसने २७ चेंडूंत ४१ धावांची वेगवान खेळी करताना सहा चौकार मारले. कॅलिस आणि मॉर्गन यांनी तिसऱ्या विकेटसाठी पाच षटकांत ६७ धावांची भागीदारी रचली. थिसारा परेराच्या १८व्या षटकात डावखुऱ्या मॉर्गनने एक षटकार आणि तीन चौकारांसह एकूण २२ धावा मोजल्या. आधीच्या सामन्यांत आपला प्रभाव पाडू न शकलेल्या मनविंदर बिस्लाने २८ धावा काढल्या. गंभीर आणि बिस्ला यांनी ५९ धावांची दमदार सलामी नोंदवली.
संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ४ बाद १८० (मनविंदर बिस्ला २८, गौतम गंभीर ५३, जॅक कॅलिस ४१, ईऑन मॉर्गन ४७; करण शर्मा १/१३) विजयी वि. सनरायजर्स हैदराबाद : २० षटकांत ७ बाद १३२ (पार्थिव पटेल २७, कॅमेरून व्हाइट ३४, थिसारा परेरा ३६; जॅक कॅलिस ३/१३, रजत भाटिया २/३३)
सामनावीर : गौतम गंभीर.
स्टीफन फ्लेमिंग, चेन्नई सुपर किंग्जचा प्रशिक्षक
थक्क करणारा सामना.. अतिशय संस्मरणीय सामना!!! मी आतापर्यंत बऱ्यापैकी सामने पाहिले आहेत. पण दोन्ही संघ आपण जिंकलोय असे समजून मैदानात धाव घेतानाचे चित्र मी पहिल्यांदाच अनुभवले.
कोलकात्याचा ‘गंभीर’ विजय
* सनरायजर्स हैदराबादवर ४८ धावांनी दणदणीत विजय * गौतम गंभीरचे दमदार अर्धशतक * जॅक कॅलिसची अष्टपैलू चुणूक रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात दिल्लीच्याच विराट कोहलीशी मैदानावर हुज्जत घालणाऱ्या गौतम गंभीरने आपला आक्रमकपणा सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात लाजवाब फलंदाजीने सादर केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-04-2013 at 02:53 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolkata knight riders won against hyderabad sunrisers