IPL 2025 Krunal Pandya Statement on Hardik Pandya After RCB Win: आरसीबीने मुंबईच्या बालेकिल्ल्यातच चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी पराभव केला. अखेरच्या षटकापर्यंत गेलेल्या या रोमांचक सामन्यात हार्दिक पंड्याच्या भावाने कृणाल पंड्याने मुंबईच्या संघाला पराभवाचा धक्का दिला. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात २२१ धावांचा पाठलाग करताना हार्दिक पंड्याचा कर्णधार असलेला संघ नऊ विकेट्सवर २०९ धावाच करू शकला. यावेळी त्याचा मोठा भाऊ कृणालने मुंबईच्या डावातील शेवटचे षटक टाकले आणि १९ धावा वाचवल्या.

कृणाल पंड्याला अखेरच्या षटकात १९ धावा वाचवायच्या होत्या. त्याने उत्कृष्ट गोलंदाजी करत या षटकात फक्त ६ धावा दिल्या आणि ३ विकेट्सही घेतल्या. कृणालने ४ षटकांत ४५ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. दोन्ही सख्खे भाऊ विरूद्ध संघात खेळत होते. हार्दिकने यापूर्वी कृणालच्या षटकात मोठ्या धावा केल्या होत्या. पण १९व्या षटकात हार्दिक बाद झाला होता. हार्दिकने ४०० च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आणि संघाला विजयाच्या जवळ नेले. पण त्याच्या भावामुळे मुंबई जिंकू शकली नाही.

मुंबईविरुद्ध चार विकेट घेत क्रुणालने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम केला. तर हार्दिकने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीत मुंबईसाठी आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने दोन गडी बाद केले आणि १५ चेंडूत ४२ धावा केल्या. एका षटकात हार्दिक आणि कृणाल आमनेसामने आले होते.

आरसीबीच्या विजयानंतर बोलताना कृणाल म्हणाला, “आमच्यातील बॉन्डिंग खूप घट्ट आहे. त्यामुळे आम्हाला माहित होतं दोन्ही पंड्यांपैकी कोणीतरी एक पंड्या जिंकणार. आमच्यामधील एकमेकांप्रतीचं प्रेम खूप नॅच्युरल आहे. हार्दिकने खूप चांगली फलंदाजी केली, मी त्याच्या वेदना समजू शकतो. पण आम्ही आरसीबी संघाने सामना जिंकला हे खूप महत्त्वाचं आहे.”

गोलंदाजीबद्दल बोलताना कृणाल म्हणाला, “मी जेव्हा गोलंदाजीला आलो तेव्हा सँटनर फलंदाजी करत होता आणि लेग साईडची बाऊंड्री छोटी होती. गेल्या १० वर्षात या मैदानावर मी जितके सामने खेळले आहेत, त्याचा अनुभव कामी आणला. गोलंदाज म्हणून तुम्हाला तुमची कामगिरी चोख पार पाडायचे असते, पण ती १०० टक्के झोकून देऊन कामगिरी पार पाडणं महत्त्वाचं असत, जे तुमच्या रणनिती प्रत्यक्षात उतरवण्यात तुम्हाला मदत करतात.”

आरसीबीचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आरसीबीने आधी चेपॉकच्या मैदानावर सीएसकेचा १७ वर्षांनी पराभव केला. यानंतर आता बंगळुरू संघाने १० वर्षांनी मुंबईच्या बालेकिल्ल्यात वानखेडे स्टेडिमयवर मुंबईचाच पराभव करत विजय नोंदवला. आरसीबीचा संघ मुंबईवरील विजयानंतर गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे.