IPL 2025 KKR vs LSG Highlights in Marathi: लखनौ सुपर जायंट्स संघाने उत्कृष्ट कामगिरीसह अखेरीस केकेआर संघावर ४ धावांनी थरारक विजय मिळवला. ईडन गार्डन्सच्या मैदानावर लखनौने प्रथम फलंदाजी करत २३९ धावांचा मोठा डोंगर उभारला. लखनौकडून मिचेल मार्श आणि निकोलस पुरन यांनी वादळी फलंदाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. पण प्रत्युत्तरात केकेआरने घरच्या मैदानावर चांगली सुरूवात केली. तरीही सुपर जायंट्सच्या संघाने अखेरच्या षटकांमध्ये भेदक गोलंदाजी करत केकेआरच्या धावांवर आळा घातला आणि अखेरीस विजय नोंदवला.

लखनौचा संघ या विजयासह गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. अखेरच्या षटकात केकेआरला विजयासाठी २४ धावांची गरज होती. रवी बिश्नोईकडे गोलंदाजीची संधी होती. हर्षित राणाने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला. तर दुसरा चेंडू डॉट बॉल गेला. यानंतर तिसऱ्या चेंडूवर हर्षितने एक धाव घेत रिंकूला स्ट्राईक दिली. आता केकेआरला विजयासाठी १९ धावांची गरज होती. रिंकूने पुढच्या दोन चेंडूवर दोन चौकार तर अखेरच्या चेंडूवर षटकार लगावला, मात्र संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही.

लखनौने दिलेल्या २४० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरची सुरूवात फारच दणक्यात झाली. केकेआरने पॉवरप्लेमध्ये ८० धावा केल्या. क्विंटन डिकॉक १५ धावा करत बाद झाला. यानंतर अजिंक्य रहाणे आणि सुनील नरेन यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. सुनील नरेन ३० धावा करत बाद झाला. तर कर्णधार अजिंक्य रहाणेने कर्णधाराला साजेशी खेळी करत ३५ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ६१ धावा केल्या. तर वेंकटेश अय्यरने २९ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह ४५ धावा केल्या. रमणदीप, अंगक्रिश आणि आंद्रे रसेल एकेरी धावसंख्येवर झेलबाद झाले. तर रिंकू सिंगने ३८ धावा केल्या.

दणक्यात सुरूवात केल्यानंतरही अजिंक्य रहाणेने विकेट गमावल्यानंतर संघाने एकामागून एक विकेट गमावल्या. केकेआरच्या फलंदाजांनी लखनौच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पण गोलंदाजांनी अखेरपर्यंत हार मानली नाही. आकाशदीपने ५५, शार्दुलने ५२, आवेश खानने ४५ तर बिश्नोईने ४७ धावा दिल्या. पण प्रत्येक खेळाडूने विकेट्स घेतल्या आहेत.

लखनौने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली आणि सलग दुसऱ्या सामन्यात त्यांच्या सलामीवीरांनी धमाकेदार सुरुवात केली. एडन मारक्रम आणि मिचेल मार्श यांनी १०.२ षटकांत ९९ धावांची धमाकेदार भागीदारी केली. माक्ररम त्याचे सलग दुसरे अर्धशतक पूर्ण करण्यापासून हुकला पण मार्शने या हंगामात त्याचे चौथे अर्धशतक केले. गेल्या सामन्यातील अपयशातून सावरत, निकोलस पूरनने पुन्हा एकदा आपली विध्वंसक खेळी केली आणि फक्त २१ चेंडूत अर्धशतक झळकावले. मार्श ४८ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांसह ८१ धावांची खेळी केली.

यानंतर निकोलस पुरनने आपली वादळी फलंदाजी सुरू ठेवली आणि अखेरपर्यंत नाबाद राहिला. पुरनने ३६ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकारांसह ८७ धावांनी नाबाद खेळी केली. यासह लखनौने ३ विकेट्स गमावत २३८ धावा केल्या.