IPL 2025 LSG vs MI Highlights in Marathi: लखनौ सुपर जायंट्स संघाने मुंबई इंडियन्स विरूद्ध नाट्यमय सामन्यात अखेरच्या षटकात शानदार विजय मिळवला. लखनौने मुंबई इंडियन्सवर १२ धावांनी विजय मिळवत मोसमातील दुसरा विजय नोंदवला. लखनौसमोर मुंबई इंडियन्सचा रेकॉर्ड कायमचं खराब राहिला आहे आणि पुन्हा एकदा लखनौने मुंबईला पराभूत करत हा रेकॉर्ड कायम ठेवला आहे. आवेश खानने अखेरच्या षटकात कमालीची गोलंदाजी करत मुंबईला पराभवाचा दणका दिला.
मुंबई इंडियन्सला अखेरच्या षटकात २२ धावांची गरज होती. आवेश खानकडे गोलंदाजी करण्याची जबाबदारी आली. आवेशच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने षटकार लगावला. यानंतर हार्दिकने २ धावा घेतल्या. तिसऱ्या चेंडूवर हार्दिकने धाव घेण्यास नकार दिला. चौथ्या चेंडूवर मोठा फटका मारायला हार्दिक चुकला. पाचव्या चेंडूवर हार्दिकने एक धाव घेतली आणि सहाव्या चेंडूवर धाव मिळाली नाही. पहिल्या चेंडूवर षटकार बसलेला असतानाही आवेश खानने यॉर्कर टाकत उत्कृष्ट गोलंदाजी करत हार्दिकला रोखलं.
अखेरच्या षटकांमध्ये शार्दुल ठाकूर आणि आवेश खान यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौने मुंबईला २०४ धावांचे लक्ष्य गाठण्यापासून रोखले. याआधी मिचेल मार्श आणि एडन मारक्रम यांनी लखनौकडून उत्कृष्ट अर्धशतकं झळकावली होती. तर मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाज दिग्वेश राठीने मुंबईच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवले.
लखनौने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारली. पुन्हा एकदा सलामीवीर मिचेल मार्शने संघासाठी स्फोटक खेळी खेळली आणि अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक झळकावले. मार्शने ३१ चेंडूत ६० धावा केल्या. यावेळी एडन मारक्रमच्या बॅटनेही काम केले आणि या सलामीवीराने मोसमातील पहिले अर्धशतक झळकावले. मात्र, यावेळी निकोलस पूरन अपयशी ठरला, तर कर्णधार पंत सलग चौथ्या सामन्यात फ्लॉप ठरला.
सलामीवीरांनंतर मधल्या फळीत आयुष बडोनीने छोटी पण तुफानी खेळी खेळली, तर डेव्हिड मिलरने शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करत संघाला २०० धावांच्या पुढे नेले. तर मुंबईसाठी कर्णधार हार्दिक पंड्याने गोलंदाजीत धुमाकूळ घातला आणि ४ षटकांत ३६ धावा देत ५ विकेट घेतले. हार्दिकने त्याच्या T20 कारकिर्दीत पहिल्यांदाच ५ विकेट घेतल्या.
मुंबई इंडियन्सकडून या सामन्यात नवी सलामी जोडी उतरली होती. मुंबईची नवी सलामी जोडी अपयशी ठरली. रोहित शर्मा गुडघ्याच्या दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडला होता. त्यामुळे त्याच्या जागी आलेल्या विल जॅक्सला संधी होती पण तो अपयशी ठरला. संघाचे दोन्ही सलामीवीर केवळ १७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यानंतर नमन धीर आणि सूर्यकुमार यादव यांनी पलटवार केला आणि आक्रमक फलंदाजी केली. नमनने अवघ्या २४ चेंडूत ४६ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने संघाची धुरा सांभाळली.
सूर्यकुमारने फॉर्ममध्ये पुनरागमन सुरूच ठेवले आणि अनेक महिन्यांनंतर टी-२० क्रिकेटमधील पहिले अर्धशतक झळकावले. मात्र, तिलक वर्मा दुसऱ्या बाजूने संघर्ष करताना दिसला, त्यामुळे मुंबईच्या धावांना ब्रेक लागला. तिलक वर्माला अखेरच्या षटकांमध्ये रिटायर्ड हर्ट करण्यात आलं. १७ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आवेश खानने सूर्याची विकेट मिळवून मुंबईला मोठा धक्का दिला, पण कर्णधार हार्दिकने येताच काही मोठे फटके मारून आशा जिवंत ठेवल्या. पण संघाला विजय मिळवून देण्यात तो कमी पडला.