लखनऊने अखेरच्या षटकात मुंबई इंडियन्सवर ४ विकेट्सने विजय साकारला. मुंबई इंडियन्सने कडवी झुंज देत लखनऊच्या तोंडचे पाणी पळवले होते. डेथ ओव्हर्समध्ये बुमराहने चांगली गोलंदाजी करत दबाव तयार केला. पंड्यानेही प्रभावी गोलंदाजी केली, पण अखेरीस लखनऊने बाजी मारली. मुंबईच्या या पराभवासह प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा संघाचा रस्ता अधिक अवघड झाला आहे. मुंबई इंडियन्स आतापर्यंत सात सामन्यांमध्ये पराभूत झाले आहेत. यासह मुंबई आणि आरसीबीची अवस्था सारखीच आहे.
मुंबईने दिलेल्या १४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊने १४५ धावा केल्या. तुषाराने पहिल्याच षटकात पदार्पणवीर अर्शीन कुलकर्णीला बाद करत ब्रेकथ्रु मिळवून दिला. त्यानंतर केएल राहुलने २८ धावा केल्या. तर मार्कस स्टोइनसने सर्वाधिक ४५ चेंडूत २ षटकार आणि ७ चौकार लगावत ६२ धावा केल्या. तर इतर सर्व खेळाडूंनी त्याला साथ देत संघाचा डाव पुढे नेला. मुंबईने या सामन्यात शेवटपर्यंत हार मानली नाही आणि त्यांनीही कडवी झुंज दिली. सामन्यात अनेकदा अशी वेळ आली की आता मुंबईचा संघ बाजी मारणार पण नशीबाने लखनऊला साथ दिली. निकोलस पुरनने मैदानावर शेवटपर्यंत टिकून राहणं लखनऊसाठी फायदेशीर ठरलं.
मुंबईकडून कर्णधार पंड्याने प्रभावी गोलंदाजी करत २ विकेट्स घेतल्या तर नुवान तुषारा, कोएत्झी आणि नबी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईची सुरूवात खूपच खराब झाली. संघाने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या १४४ धावा केल्या. संघाचे महत्त्वाचे फलंदाज अगदी स्वस्तात बाद झाले. रोहित शर्मा दुसऱ्या षटकात बाद झाल्यानंतर मुंबईने एकामागून एक विकेट्स गमावल्या. मुंबईने पॉवरप्लेमध्ये केवळ २८ धावा केल्या. रोहित शर्मा ४ धावा, सूर्यकुमार १० धावा, तिलक वर्मा ७ धावा तर कर्णधार हार्दिक पंड्या गोल्डन डकवर आऊट झाला. त्यानंतर इशान किशन आणि नेहाल वधेराने संघाचा डाव सावरला. इशानने बाद होण्यापूर्वी ३६ चेंडूत ३ चौकारांसह ३२ धावा केल्या. तर नेहाल वधेराने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ४१ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकार लगावले.
इशान आणि नेहाल बाद झाल्यानंतर टीम डेव्हीडने संघाला १४० चा टप्पा पार करून दिला. टीम डेव्हीडने १८ चेंडूत १ षटकार आणि ३ चौकारांसह ३५ धावा केल्या. यासह मुंबईने ७ बाद १४४ धावा केल्या. लखनऊकडून मोहसीन खानने २ विकेट, तर रवी बिश्नोई , मयंक यादव, नवीन उल हक आणि स्टोइनस यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.