IPL 2025 RR vs LSG Highlights in Marathi: राजस्थान रॉयल्सचा अजून एक सामना अखेरच्या चेंडूपर्यंत पोहोचला आणि लखनौ सुपर जायंट्स संघाने २ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. राजस्थानला अखेरच्या षटकात ९ धावांची गरज होती. पण आवेश खानच्या यॉर्करसमोर राजस्थानचे फलंदाज अपयशी ठरले. संपूर्ण सामन्यात राजस्थानचा संघ सामन्यात पुढे होता, पण अखेरच्या दोन षटकांमध्ये संपूर्ण सामना फिरला.

दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सुपर ओव्हर झालेल्या सामन्यातील सारखीच स्थिती या सामन्यात पाहायला मिळाली. राजस्थानला अखेरच्या षटकात ९ धावांची गरज होती. ध्रुव जुरेलने पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली, दुसऱ्या चेंडूवर २ धावा घेतल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर शिमरॉन हेटमायर झेलबाद झाला. चौथा चेंडू आवेशने कमालीचा यॉर्कर टाकला ज्यावर एकही धाव घेता आली नाही.

पाचव्या चेंडूवर शुभम दुबेने मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्न केला आणि चेंडू हवेत उडाला पण मिलरकडून कॅच ड्रॉप झाली. यासह राजस्थानला विजयासाठी १ चेंडूत ४ धावांची गरज होती. शुभम दुबेला आवेशने अखेरचा चेंडू यार्कर टाकला आणि दोघेही फक्त २ धावा घेऊ शकले यासह लखनौने सामन्यात दणदणीत विजय मिळवला.

जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना १८० धावा केल्या. सलामीवीर एडेन मारक्रम आणि मधल्या फळीतील फलंदाज आयुष बदोनी यांनी दमदार अर्धशतकं झळकावली. प्रत्युत्तरादाखल, राजस्थानकडून यशस्वी जैस्वालने शानदार अर्धशतक झळकावले. तर १४ वर्षीय वैभवने पदार्पण करत असताना, त्यानेही शानदार फलंदाजी केली. पण पुन्हा एकदा राजस्थानचे फिनिशर संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत.

लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करता २० षटकांत १८० धावांचा टप्पा गाठला. मिचेल मार्श या सामन्यात ४ धावा करत बाद झाला असला तरी मारक्रमने मात्र संघाचा डाव उचलून धरला. मारक्रम ४५ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ६६ धावा करत बाद झाला. तर आयुष बदोनीने अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. पण तरीही संघाने १९ षटकांत १५३ धावा केल्या होत्या. यानंतर संदीप शर्माच्या अखेरच्या षटकात अब्दुल समदने वादळी फटकेबाजी करत ४ षटकार लगावले आणि संघाला १८० धावांचा टप्पा गाठून दिला. अब्दुल समदने १० चेंडूत ४ षटकारांसह ३० धावांची मह्त्त्वपूर्ण खेळी केली.