SRH vs LSG IPL 2025 Match Highlights in Marathi: लखनौ सुपर जायंट्स संघाने वादळी फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हैदराबादविरूद्ध विस्फोटक फलंदाजी करत ५ विकेट्सने विजय मिळवला. लखनौच्या संपूर्ण संघाने उत्कृष्ट कामगिरी करत हैदराबादला सामन्यात कायमच बॅकफूटवर ठेवलं. गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांवर आळा घातला. तर निकोलस पूरन आणि मिचेल मार्शने हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई करत गतवर्षीच्या पराभवाचा व्याजासकट बदला घेतला. या विजयासह लखनौने आयपीएल २०२५ च्या गुणतालिकेत आपले खाते उघडले आहे.
गतवर्षी म्हणजेच आयपीएल २०२४ मध्ये हैदराबादचे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडने १० विकेट्सने लखनौचा ६२ चेंडू राखून मोठा मानहानीकारक पराभव केला होता. निकोलस पूरन आणि मिचेल मार्श यांनी देखील आपल्या विस्फोटक फलंदाजीने त्या पराभवाचा बदला घेत संघाचा विजय निश्चित केला. निकोलस पूरन आणि मिचेल मार्श यांनी ११६ धावांची संघासाठी मोठी भागीदारी रचली.
निकोलस पूरनने पुन्हा एकदा विस्फोटक खेळीचा नमुना सादर केला. पूरनने २६ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांसह ७० धावांची खेळी केली. तर मिचेल मार्शनेही त्याला चांगली साथ दिली. या दोघांच्या खेळीमुळे लखनौने त्यांची पॉवरप्लेमधील सर्वात मोठी धावसंख्या उभारली. लखनौने पॉवरप्लेमध्ये १ बाद ७७ धावा केल्या. तर ८ षटकांतच लखनौने १०० धावांचा टप्पा गाठला होता. निकोलस पूरनशिवाय मिचेल मार्शनेही शानदार फटकेबाजी केली.
लखनौ सुपर जायंट्सची वादळी फलंदाजी
हैदराबादने दिलेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौला सुरूवातीच्या षटकांमध्ये धक्का बसला. पण नंतर निकोलस पूरन आणि मिचेल मार्शने वादळी फलंदाजीसह मात्र हैदराबादला सामन्यात पुन्हा परतण्याची संधी दिली नाही. मिचेल मार्शने ३१ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ५२ धावांची खेळी करत सलग दुसरे अर्धशतक केले. तर निकोलस पूरनच्या खेळीने हैदराबादच्या गोलंदाजांची शाळा घेतली. यानंतर ऋषभ पंतने १५ धावांची खेळी केली, तर आयुष बदोनी ६ धावा करत बाद झाला. यानंतर मिलरने विजयी चौकार मारत १३ धावा केल्या. तर अब्दुल समदने ८ चेंडूत २ चौकार आणि २ षटाकारांसह महत्त्वपूर्ण २२ धावांची विस्फोटक खेळी करत संघाला २४ चेंडू राखून विजय मिळवून दिला.
तत्त्पूर्वी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादला वादळी सुरूवात करू दिली नाही. हैदराबादच्या फलंदाजीला आळा घालण्याचं काम शार्दुल ठाकूरने केलं. त्याने त्याच्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये ११ डॉट बॉल टाकले. चांगल्या सुरूवातीसह शार्दुलने हैदराबादला सुरूवातीचे दोन धक्के दिले. अभिषेक शर्मा ६ धावा करत बाद झाला, तर इशान किशन गोल्डन डकवर बाद झाला. यानंतर ट्रॅव्हिस हेडने संघाचा डाव सावरत ४७ धावा केल्या पण तोही क्लीन बोल्ड झाला. नितीश रेड्डीने ३२ धावा केल्या तर क्लासेन २६ धावा करत रनआऊट झाला.
यानंतर अनिकेत वर्माने ५ षटाकारांसह ३६ धावांची वादळी खेळी केली. तर कमिन्सनेह १८ धावांचे योगदान दिले. तर हर्षल पटेल १२ धावा करत बाद झाला. अशारितीने हैदराबादचा संघ १९० धावा करू शकला. शार्दुल ठाकूरने ४ षटकांत ३४ धावा देत ४ विकेट्स घेतले. तर आवेश खान, दिग्वेश राठी, प्रिन्स यादव आणि रवी बिश्नोई यांनी १-१ विकेट घेतली.