SRH vs LSG IPL 2025: ऋषभ पंतच्या नेतृत्त्वाखालील लखनौ सुपर जायंट्स संघाने आयपीेएल २०२५ मधील आपला पहिला विजय नोंदवला. लखनौने हैदराबाद संघाचा ५ विकेट्स आणि २४ चेंडू राखून त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभव केला. यासह लखनौच्या खेम्यातील माहोल बदलला आहे. दिल्लीविरूद्धच्या पहिल्या सामन्यात लखनौला अखेरच्या षटकात पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे नक्कीच नक्कीच तणावाचं वातावरण होतं, पण आता लखनौचे मालक संजीव गोयंका यांनी विजयानंतर पंतला घट्ट मिठी मारल्याचा फोटो व्हायरल होत आहे.

LSG ने गुरुवारी २७ तारखेला झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) वर पाच गडी राखून शानदार विजय नोंदवला. शार्दुल ठाकूरची भेदक गोलंदाजी आणि निकोलस पूरनच्या २६ चेंडूत ७० धावांच्या स्फोटक खेळीमुळे लखनौने केवळ १६.१ षटकात १९१ धावांचे लक्ष्य यशस्वीपणे गाठले आणि आयपीएल २०२५ च्या गुणतालिकेत आपले खाते उघडले.

दरम्यान डेव्हिड मिलरने विजयी चौकार मारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. लखनौचा विजय पाहून संघाचे मालक संजीव गोयंका यांनीही संघाचं कौतुक केलं. क्रिकेटप्रेमी असलेले गोयंका विजयानंतर लगेच पायऱ्यांवरून खाली उतरले आणि ऋषभ पंतला घट्ट मिठी मारली. गोयंका यांनी संघाचे मेन्टॉर झहीर खानला देखील शुभेच्छा दिल्या. झहीर खानच्या मार्गदर्शनाखाली लखनौ संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजय नोंदवला.

हैदराबादच्या मैदानावरील संजीव गोयंका

गतवर्षी २०२४ च्या आयपीएलमध्ये याच मैदानावर संजीव गोयंका यांचा वेगळाच अवतार पाहायला मिळाला होता. केएल राहुलच्या नेतृत्त्वाखाली आयपीएल २०२४ मध्ये लखनौ संघाचा सनरायझर्स हैदराबाद संघाने ११ षटकांत १० विकेट्सने दारूण पराभव केला होता. लखनौच्या इतिहासातील हा एक लाजिरवाणा पराभव होता. या पराभवानंतर संजीव गोयंका यांनी मैदानात येत केएल राहुलला चांगलंच सुनावलं होतं. त्यांचा संतापलेला चेहरा आणि राहुलला ओरडतानाचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत होता.

पण यंदा हैदराबादच्या मैदानावरील हे चित्र बदललं आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्त्वाखालील लखनौने हैदराबादच्या धावांना चांगलाच ब्रेक लावला आणि त्यांच्याच आक्रमक शैलीत पराभूत केलं. शार्दुल ठाकूरच्या नेतृत्त्वातील गोलंदाजी विभागाने हैदराबादच्या फलंदाजांच्या धावांना ब्रेक लावला आणि झटपट एकामागून एक फलंदाजांना माघारी धाडले. यासह हैदराबादचा संघ ९ बाद १९० धावा करू शकला. पहिल्याच सामन्यात २८६ धावा केलेला हैदराबादचा संघ या सामन्यात धावा काढण्यासाठी मोठे कष्ट घेताना दिसला.