IPL 2024 : लखनौ सुपरजायंटस टीमचे मालक संजीव गोयंका हे गेल्या काही दिवसांपासून टीकेचे धनी झाले आहेत. ८ मे रोजी लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) सामना सनरायझर्स हैदराबादशी (SRH) झाला होता. प्रथम फलंदाजी करताना एलएसजीने १६५ धावा केल्या होत्या. मात्र एसआरएचने एकही गडी न गमावता अवघ्या ९.४ षटकात सामना खिशात घातला. त्यानंतर टीमचे मालक संजीव गोयंका यांनी कर्णधार केएल राहुलशी मैदानातच वादावादी केली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चहुबाजूंनी संजीय गोयंका यांच्यावर टीका करण्यात आली. यानंतर आज एलएसजीचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी (DC) होत आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला गोयंका यांनी केएल राहुलला आपल्या घरी जेवणाचे निमंत्रण दिले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पॉईंट्स टेबलवर एलएसजीचा संघ सातव्या स्थानावर तर डीसीचा संघ सहाव्या स्थानावर आहे. दोन्ही संघाने १२ अंकाची कमाई आतापर्यंत केली आहे. एलएसजीने आजचा सामना जिंकला तर त्यांना १६ अंक मिळविण्याची संधी आहे. तर दुसरीकडे डीसीचा हा शेवटचा सामना असल्यामुळे त्यांच्यासाठी ही करो या मरोची लढाई आहे. दरम्यान गोयंका यांनी या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी कर्णधार केएल राहुलला जेवणाचे निमंत्रण देऊन एकप्रकारे वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असून संघातही यानिमित्ताने सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

केएल राहुल लखनऊची साथ सोडणार? LSGचे मालक संजीव गोयंका यांच्याबरोबरचा VIDEO व्हायरल झाल्यांनंतर चर्चांना उधाण

संजीव गोयंका आणि केएल राहुल यांच्या या भेटीचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. केएल राहुल गोयंका यांच्याशी हस्तांदोलन करताना आणि गळाभेट करताना दिसत आहे. एलएसजीला या हंगामात क्लालिफाय व्हायचे असेल तर उरलेले दोन्ही सामने चांगल्या रन रेटने जिंकावे लागणार आहेत. दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या आजच्या सामन्यात त्यांच्यासाठीही करो या मरोची स्थिती असणार आहे.

लखनौ सुपर जायंट्सचे सहाय्यक प्रशिक्षक लान्स क्लुसनर यांनी गोयंका आणि केएल राहुलचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया दिली होती. “दोघांच्या चर्चेमध्ये मला कोणतीही अडचण दिसत नाही. त्यामुळे आमच्यासाठी हे फक्त चहाच्या पेल्यातील वादळ आहे, असे मला वाटते. क्रिकेटवर उत्साहाने, ऊर्जेने केलेली चर्चा आम्हाला नेहमीच आवडते. मला वाटतं की अशा प्रकारे संघ चांगले होतात. आमच्यासाठी ही फार मोठी गोष्ट नाही.”

दरम्यान संजीव गोयंका यांच्या वर्तनामुळे केएल राहुल नाराज असून तो पुढील हंगामात संघ सोडणार असल्याचेही बोलले गेले. संजीव गोयंका यांचे क्रिकेटमधील निर्णय याआधीही वादग्रस्त ठरले आहेत. पुणे रायझिंग सुपर जायंट्सचे सह-मालक असताना त्यांनी एमएस धोनीला संघाच्या कर्णधार पदावरून बाजूला केले होते. धोनीला हटवून त्यांनी स्टीव्ह स्मिथला कर्णधार बनवले, परंतु त्यानंतरही ते विजेतेपद मिळवू शकले नाहीत. त्यामुळे केएल राहुल एलएसजीला राम राम ठोकू शकतो, अशी चर्चा होत होती. मात्र याबाबत संघ व्यवस्थापन किंवा खेळाडूंनी अधिकृत भाष्य केलेले नाही.

केएल राहुलवर LSG चे मालक संजीव गोयंका भडकले की..? अखेर प्रशिक्षकांनी सांगितलं कारण, म्हणाले, “पाठिंबाच नाही..”

आयपीएल २०२४ मधील केएल राहुलची कामगिरी

आयपीएल २०२४ मधील केएल राहुलच्या कामगिरीबद्दल बोलायचे, तर त्याने या हंगामात त्याच्या संघासाठी खेळलेल्या १२ सामन्यांच्या १२ डावांमध्ये सर्वाधिक ४६० धावा केल्या आहेत. केएल राहुलचा स्ट्राईक रेट आतापर्यंत १३६.०९ आहे तर त्याची सरासरी ३८.३३ आहे. या हंगामात त्याने ३ अर्धशतके झळकावली आहेत. या दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या ८३ धावा आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lsg owner sanjiv goenka hosts kl rahul for dinner ahead of delhi match kvg
Show comments