आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ३१ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने लखनऊ सुपर जायट्सला धूळ चारली. लखनऊचा १८ धावांनी पराभव झाला. या पराभवाचे शल्य बोचत असतानाच आता लखनऊचा कर्णधार केएल राहुलला आणखी एक झटका बसला आहे. बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवत केएल राहुलला दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलने केलेल्या दंडात्मक कारवाईप्रमाणे केएल राहुलला सामन्याच्या फीसच्या २० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. केएल राहुलसोबतच मार्कस स्टॉइनिसलाही आयपीएलने फटकारले आहे.
हेही वाचा >> LSG vs RCB : “आम्ही त्यांना २० अतिरिक्त धावा दिल्या”; लखनऊच्या पराभवानंतर संतापला केएल राहुल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरोधातील सामन्यात नियमांची पायमल्ली केल्यामुळे केएल राहुलला आयपीएलने दंड ठोठावला आहे. या दंडानुसार या सामन्यातील फीसच्या २० टक्के रक्कम राहुलला दंड म्हणून भरावी लागणार आहे. राहुलला कोणत्या कारणामुळे त्याला दंड ठोठावण्यात आला आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र लेव्हल १ चा गुन्हा केल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात राहुलने आरोप मान्य केल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा >> RCB vs LSG : बाद झाल्यानंतर संतापलेल्या मार्कस स्टॉइनिसने केली शिवीगाळ; पहा VIDEO
त्याचबरोबर लखनऊचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉईनिस यालादेखील आचारसंहितेचा भंग केल्यामुळे आयपीएलने फटकारले आहे. २४ धावांवर खेळत असताना त्रिफळाचित झाल्यानंतर त्याने रागराग केला होता. याच कारणामुळे आयपीएलने त्याला फटकारले आहे. विशेष म्हणजे त्याच्यावरदेखील लेव्हल १ चा गुन्हा केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून त्याने तो कबुल केला आहे.
हेही वाचा >> IPL 2022, RCB vs LSG : ‘रॉयल’ फॅफ डू प्लेसिसच्या बळावर लखनऊला चारली धूळ, बंगळुरुचा १८ धावांनी विजय
दरम्यान, बंगळुरुविरुद्ध झालेल्या सामन्यात लखनऊचा १८ धावांनी पराभव झाला. यासामन्यात लखनऊचा कृणाल पांड्या आणि केएल राहुल वगळता एकाही खेळाडूला चांगली कामगिरी करता आलेली नाही. बंगळुरुने लखनऊसमोर विजयासाठी १८२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र वीस षटकांमध्ये लखनऊ संघ १६३ धावा करु शकला.