LSG vs DC Match Highlights: केएल राहुल पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा हिरो ठरला आहे. आपल्या जुन्या संघाविरूद्ध खेळताना केएल राहुलची बॅट चांगलीच तळपली. दिल्लीचा संघ या सामन्यात १६० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. या धावांचा पाठलाग करताना अभिषेक पॉवेलचं दमदार अर्धशतक, केएल राहुल आणि अक्षर पटेलच्या शानदार फलंदाजीच्या बळावर दिल्लीने ८ गडी राखून विजय मिळवला. यासह गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

दिल्लीचा शानदार विजय

दिल्ली कॅपिटल्सला हा सामना जिंकण्यासाठी १६० धावा करायच्या होत्या. खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती. चेंडू बॅटवर चांगल्याप्रकारे येत होता. हे पाहता १६० धावा करणं फार कठीण काम नव्हतं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी अभिषेक पॉरेल आणि करूण नायरची जोडी मैदानावर आली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ३६ धावा जोडल्या. करुण नायरने काही आकर्षक फटके मारले, पण तो १६ धावा करत माघारी परतला. अभिषेकने आपली फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याने ३६ चेंडूंचा सामना करत ५१ धावांची खेळी केली. शेवटी केएल राहुल शो पाहायला मिळाला. त्याने अक्षर पटेलसोबत मिळून दिल्लीचा विजय निश्चित केलं.

लखनऊने केल्या १५९ धावा

या सामन्यात दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून लखनऊ सुपर जायंट्सला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. लखनऊकडून डावाची सुरूवात करण्यासाठी मिचेल मार्श आणि एडन मार्करमची जोडी मैदानावर आली. या दोघांनी संघाला वादळी सुरूवात करून दिली. ज्याप्रकारे हे दोन्ही फलंदाज फलंदाजी करत होते, ते पाहता असं वाटलं होतं की लखनऊचा संघ मोठी धावसंख्या उभारणार. सलामीला फलंदाजी करताना एडन मार्करमने ३३ चेंडूंचा सामना करत ५२ धावांची खेळी केली. तर मिचेल मार्श ३६ चेंडूंवर ४५ धावांची खेळी करून माघारी परतला.

सलामी जोडीने संघाला चांगली सुरूवात करुन दिली. पण त्यानंतर आलेल्या फलंदाजांना या चांगल्या सुरूवातीचा फायदा करून घेता आला नाही. फॉर्मात असलेला निकोलस पूरने अवघ्या ९ धावांवर तंबूत परतला. तर अब्दुल समद २ धावांवर माघारी परतला. या डावात रिषभ पंतने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यायला हवं होतं. मात्र तो शेवटचे २ चेंडू शिल्लक असताना सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि शून्यावर बाद होऊन माघारी परतला. शेवटी आयुष बदोनीने २१ चेंडूंचा सामना करत ३६ धावांची खेळी केली. तर डेव्हिड मिलर १४ धावांवर नाबाद माघारी परतला. लखनऊला २० षटकअखेर ६ गडी बाद १५९ धावा करता आल्या.