IPL 2025 Big Blow to Gujarat Titans: आयपीएल २०२५ मध्ये शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखालील गुजरात टायटन्स संघ तुफान फॉर्मात आहे. गुजरातने पहिला सामना गमावल्यानंतर या स्पर्धेत एक कमालीचा फॉर्म राखला आहे. पहिला सामना गमावल्यानंतर गुजरातने विजयी चौकार लगावत सलग चार सामने जिंकले. यासह गुजरातचा संघ सध्या आयपीएलच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहे. पण स्पर्धेदरम्यान गुजरात संघाला मोठा धक्का बसला असून स्टार खेळाडू मैदानाबाहेर झाला आहे.
गुजरात टायटन्सच्या ताफ्यात एकापेक्षा एक कमालीचे खेळाडू आहे. दरम्यान त्यांच्या संघाला स्टार खेळाडू अचानक मायदेशी परतला आहे. एका सामन्यात खेळताना फिल्डिंगदरम्यान त्याला दुखापत झाली होती आणि आता तो मायदेशी परतला असून संपूर्ण स्पर्धेत बाहेर झाला आहे. गुजरात टायटन्सचा संघ त्यांचा सहावा सामना लखनौ सुपर जायंट्स संघाविरूद्ध खेळत आहे.
एक उत्कृष्ट अष्टपैलू आणि कमालीचा फिल्डर म्हणून ओळख असलेला ग्लेन फिलिप्स आयपीएल २०२५ मध्ये गुजरातच्या ताफ्यात होता. पण आता दुखापतीमुळे फिलिप्सने संघाची साथ सोडली असून तो मायदेशी परतला आहे. ग्लेन फिलिप्सने गुजरातच्या एकाही सामन्याच्या प्लेईंग इलेव्हनचा भाग नव्हता. पण सबस्टिट्यूट खेळाडू म्हणून उतरला होता. फिलिप्सने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये एकापेक्षा एक उत्कृष्ट झेल टिपत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
६ एप्रिलला सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून क्षेत्ररक्षण करताना ग्लेन फिलिप्सला दुखापत झाली होती. या सामन्यात फिलिप्स गुजरातकडून सबस्टिट्यूट खेळाडू म्हणून मैदानात उतरला होता. पण थ्रो मारण्याचा प्रयत्न करताना त्याच्या मांडीमधील स्नायूंवर ताण आला आणि नंतर त्याला आपल्या सहकारी खेळाडूंच्या मदतीने मैदानाबाहेर जावे लागले. या दुखापतीनंतर फिलिप्स सराव सत्रातही दिसला नव्हता.
तसेच फिलिप्सच्या जाण्यामुळे गुजरातचा संघ नक्कीच तणावाखाली असेल. त्याच्या आधी कागिसो रबाडा देखील मायदेशी दक्षिण आफ्रिकेत परतला होता. तो संघात कधी सामील होईल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता गुजरात संघात सध्या फक्त पाच विदेशी खेळाडू आहेत. ज्यामध्ये जोस बटलर, शेरफेन रदरफोर्ड, रशीद खान, गेराल्ड कोएत्झी आणि करीम जनत यांचा समावेश आहे. पण सध्याच्या घडीला गुजरातचा संघ फॉर्मात असून प्लेईंग इलेव्हनमधील खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत.