IPL 2023, MI vs LSG Cricket Score Update: आयपीएल २०२३ मध्ये, मंगळवारी लीगच्या ६३व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा सामना मुंबई इंडियन्सशी संपन्न झाला. हा सामना लखनऊच्या एकाना स्टेडियमवर खेळवला गेला. मुंबई आणि लखनऊचे संघ गुणतालिकेत अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर होते. हा सामना दोन्ही संघांसाठी ‘करो किंवा मरो’ असा होता. त्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबईवर पाच धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. या पराभवामुळे मुंबईचा प्ले ऑफचा मार्ग खडतर झाला आहे. दोन्ही संघ हा सामना व्हर्च्युअल नॉकआऊटप्रमाणे खेळले. रोहित शर्मा आणि इशान किशनची खेळी व्यर्थ ठरली. मार्कस स्टॉयनिसला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
प्रत्युत्तरात मुंबई संघाची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी ९० धावांची भक्कम भागीदारी केली. ते दोन्ही खेळत असताना मुंबई इंडियन्स सामना एकहाती जिंकेल असे वाटत होते पण रवी बिश्नोईने सलामीवीर रोहित आणि इशान यांना एकापाठोपाठ बाद केले. रोहित ३७ धावांवर बाद झाला, तर इशानने अर्धशतक झळकावले. त्याने ३९ चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने सर्वाधिक ५९ धावा केल्या. शतकी खेळी खेळणाऱ्या सूर्यकुमारची बॅट आजच्या सामन्यात चालली नाही. ९ चेंडूत ७ धावा करून तो बाद झाला. त्याला यश ठाकूरने बोल्ड केले. नेहल वढेरालाही मोठी खेळी खेळता आली नाही. त्याने २० चेंडूत २ चौकारांच्या मदतीने १६ धावा केल्या. विष्णू विनोद पुन्हा एकदा संघासाठी मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला, तो २ धावांवर बाद झाला. टीम डेव्हिडने प्रयत्न केले पण ते अपयशी ठरले. त्याने १९ चेंडूत नाबाद ३२ धावा केल्या. लखनऊकडून यश ठाकूर आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. शेवटच्या षटकात ६ चेंडूत ११ धावांची गरज होती मात्र मुंबई केवळ ६ धावाच करू शकली आणि लखनऊने पाच धावांनी सामना जिंकला.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनऊ संघाची सुरुवात खराब झाली. ५० धावांच्या आतच संघाचे पहिले तीन खेळाडू बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. क्विंटन डी कॉक आणि दीपक हुडा सलामीवीर लवकर बाद झाले, त्यांना विशेष कामगिरी करू शकले नाहीत. दीपक हुडा अवघ्या ५ धावा करून बाद झाला. यानंतर प्रेरक मांकडला भोपळाही फोडता आला नाही. क्विंटन डी कॉकने क्रुणाल पांड्यासोबत भागीदारी करत संघाची धावसंख्या ३०च्या पुढे नेली, पण त्यानंतर तोही इशान किशनच्या हाती झेलबाद झाला.
संघाचा कर्णधार क्रुणाल पांड्या मोक्याच्या क्षणी दुखापतग्रस्त झाला आणि त्याने मैदान सोडले. क्रुणालने ४२ चेंडूत ४९ धावा केल्या. यानंतर मार्कस स्टॉयनिसने डावाची सूत्रे आपल्या हाती घेत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. त्याने निकोलस पूरनला हाताशी घेत अर्धशतकी भागीदारी केली. स्टॉयनिसने वेगवान फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४७ चेंडूत ४ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ८९ धावांची सर्वोच्च नाबाद खेळी खेळली. पूरणनेही ८ चेंडूत ८ धावा करत त्याला साथ दिली. मुंबईच्या जेसन बेहरेनडॉर्फने सर्वाधिक २ गडी बाद केले त्याला पीयूष चावलाने १ गडी बाद करत मदत केली. लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा पाच धावांनी पराभव केला. या विजयासह लखनऊचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
हे आहेत दोन्ही संघ
लखनऊ सुपर जायंट्स: क्विंटन डिकॉक (यष्टीरक्षक), दीपक हुडा, प्रेरक मांकड, कृणाल पांड्या (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, स्वप्नील सिंग, मोहसिन खान.
राखीव खेळाडू: यश ठाकूर, डॅनियल सॅम्स, कृष्णप्पा गौतम, युधवीर सिंग, काइल मेयर्स.
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, ख्रिस जॉर्डन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल.
राखीव खेळाडू: विष्णू विनोद, रमणदीप सिंग, ट्रिस्टन स्टब्स, कुमार कार्तिकेय, राघव गोयल.