IPL 2025, PBKS VS LSG Highlights: लखनौनं दिलेलं १७२ धावांचं आव्हान १६.२ षटकातच पार करत पंजाबने ८ विकेट्सनी दणदणीत विजय साकारला. लखनौच्या धुवांधार फलंदाजांना १७१ धावांतच रोखत पंजाबने अर्धी मोहीम फत्ते केली होती. प्रभसिमरन सिंग आणि नेहल वढेरा यांनी जोरदार फटकेबाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

Live Updates

IPL 2025, Lucknow Super Giants vs Punjab Kings Highlights 

आयपीएल २०२५ लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज लाईव्ह मॅच अपडेट्स

22:38 (IST) 1 Apr 2025

पंजाबने उडवला लखनौचा धुव्वा

नेहल वढेरा आणि श्रेयस अय्यर यांनी मनमुराद फटकेबाजी करत पंजाबला दिमाखदार विजय मिळवून दिला.

22:12 (IST) 1 Apr 2025

प्रभसिमरन तंबूत

दिग्वेश राठीच्या गोलंदाजीवर आयुष बदोनीने प्रभसिमरनचा झेल टिपला. स्वत: सीमारेषेपलीकडे जात असल्याचं लक्षात येताच बदोनीने चेंडू आत फेकला, रवी बिश्नोईने चपळतेने झेल पूर्ण केला. प्रभसिमरनने ३४ चेंडूत ६९ धावांची तडाखेबंद खेळी केली.

22:02 (IST) 1 Apr 2025

प्रभसिमरनचा तडाखा

माफक लक्ष्याचा पाठलाग करताना प्रभसिमरन सिंगने लखनौच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. अर्धशतकी खेळीसह प्रभसिमरनने पंजाबच्या विजयाचा पाया रचला आहे.

21:39 (IST) 1 Apr 2025

दिग्वेश राठीने लखनौला मिळवून दिलं पहिलं यश

दिग्वेश राठीने लखनौला पहिलं यश मिळवून दिलं. त्याने प्रियांश आर्यला बाद केलं. प्रियांशने ८ धावा केल्या. विकेटनंतर प्रियांशने केलेलं सेलिब्रेशन सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

21:09 (IST) 1 Apr 2025

लखनौचं पंजाबला १७२ धावांचं आव्हान

पंजाबने शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर लखनौला १७१ धावांतच रोखले. मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत, डेव्हिड मिलर या फटकेबाजांना आवर घालत पंजाबने धावगतीला वेसण घातली. निकोलस पूरनने ४४ तर आयुष बदोनीने ४१ धावांची खेळी केली. पंजाबतर्फे अर्शदीपने ३ विकेट्स घेतल्या.

21:04 (IST) 1 Apr 2025

अब्दुल समद तंबूत

अर्शदीप सिंगने शेवटच्या षटकात आयुष बदोनीपाठोपाठ अब्दुल समदलाही तंबूत धाडलं.

21:03 (IST) 1 Apr 2025

आयुष बदोनी माघारी

३३ चेंडूत ४१ धावांची उपयुक्त खेळी करून आयुष बदोनी तंबूत परतला. अर्शदीप सिंगने त्याला बाद केलं.

20:30 (IST) 1 Apr 2025

युझवेंद्र चहलचं पुनरागमन; निकोलस पूरन तंबूत

पहिल्या षटकात निकोलस पूरनच्या बॅटचा तडाखा झेललेल्या युझवेंद्र चहलने दुसऱ्या षटकात त्याचा अडसर दूर केला. पूरनने ३० चेंडूत ४४ धावा केल्या. मिचेल मार्श, एडन मारक्रम, ऋषभ पंत पाठोपाठ निकोलस पूरनही बाद झाल्याने लखनौच्या धावगतीला वेसण घातली आहे.

20:18 (IST) 1 Apr 2025

निकोलस पूरनने केली युझवेंद्र चहलची धुलाई

पंजाबचा प्रमुख फिरकीपटू असलेल्या युझवेंद्र चहलचं स्वागत निकोलस पूरनने चौकार आणि षटकाराने केलं. पूरनने चहलच्या पहिल्याच षटकात १५ धावा वसूल केल्या.

19:55 (IST) 1 Apr 2025

ऋषभ पंत पुन्हा अपयशी

नव्या संघाकडून खेळताना मोठ्या खेळीसाठी प्रयत्नशील ऋषभ पंत ग्लेन मॅक्लवेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. मॅक्सवेलच्या लेगस्टंपबाहेरच्या चेंडूवर खाली पडून स्वीप करण्याचा ऋषभचा प्रयत्न शॉर्ट फाईनलेगला युझवेंद्र चहलच्या हातात जाऊन विसावला. पंत केवळ २ धावा करू शकला.

19:50 (IST) 1 Apr 2025

षटकार, चौकार आणि त्रिफळाचीत

लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर एडन मारक्रमने चौकार आणि षटकार वसूल केला. मात्र पुढच्याच चेंडूवर फर्ग्युसनने मारक्रमला त्रिफळाचीत केलं. मारक्रमने १८ चेंडूत २८ धावा केल्या.

19:45 (IST) 1 Apr 2025

मारक्रमची फटकेबाजी

लखनौच्या एडन मारक्रमने अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर दोन चौकार वसूल केले.

19:36 (IST) 1 Apr 2025

अर्शदीपने दूर केला मिचेल मार्शचा अडथळा

डावखुऱ्या अर्शदीप सिंगने धोकादायक मिचेल मार्शला भोपळाही फोडू दिला नाही.

19:11 (IST) 1 Apr 2025

पंजाब किंग्जने टॉस जिंकला; गोलंदाजीचा निर्णय

पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेकीचा कौल जिंकला असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. अष्टपैलू ओमरझाईऐवजी वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला अंतिम अकरात समाविष्ट करण्यात आलं आहे. लखनौच्या संघात कोणताही बदल झालेला नाही.

18:48 (IST) 1 Apr 2025

लखनौची खेळपट्टी फिरकीला साथ देणार?

लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच लढत होत आहे. संथ आणि धीम्या स्वरुपाची ही खेळपट्टी फिरकीला साथ देण्याची शक्यता आहे. दवाचा मुद्दा कळीचा ठरू शकतो.

18:15 (IST) 1 Apr 2025

विजयकुमार व्यशक का हरप्रीत ब्रार

पंजाबसाठी विजयकुमार व्यशकने टिच्चून गोलंदाजी केली आहे. पण खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असल्यास व्यशकऐवजी हरप्रीत ब्रारला संधी मिळू शकते.

17:45 (IST) 1 Apr 2025

लखनौचं पराभवातून पुनरागमन; पंजाबची दणक्यात सुरुवात

लखनौनं सलामीच्या लढतीत २०९ धावांचा डोंगर उभारला. उत्तरार्धात लखनौचीच सामन्यावर पकड होती पण आशुतोष शर्माच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर दिल्लीने एका विकेटने थरारक विजय मिळवला.

पंजाबनेही सलामीच्या लढतीत २४३ धावांचा डोंगर उभारला. गुजरातने चांगली टक्कर देत २३२ धावांची मजल मारली. पंजाबने ११ धावांनी विजय मिळवला.

तडाखेबंद फटकेबाजीसाठी प्रसिद्ध हैदराबादला लखनौनं १९० धावांतच रोखलं. मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांच्या वादळी खेळींच्या जोरावर लखनौनं १६ षटकातच हे लक्ष्य गाठलं.

17:31 (IST) 1 Apr 2025

लिलावात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये मुकाबला

यंदाच्या हंगामापूर्वी झालेल्या लिलावात पंजाब किंग्ज संघाने श्रेयस अय्यरसाठी तब्बल २६.७५ कोटींची बोली लावून त्याला ताफ्यात समाविष्ट केलं. श्रेयसच्या नेतृत्वात गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाने जेतेपदावर नाव कोरलं होतं. जेतेपद पटकावूनही कोलकाताने श्रेयसला रिटेन केलं नाही. पंजाबला नव्याने संघबांधणी करायची होती. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या मार्गदर्शनात खेळणाऱ्या पंजाबला श्रेयसच्या रुपात चांगला कर्णधार मिळाला.

आयपीएल लिलावाच्या इतिहासात सर्वाधिक बोलीचा मान श्रेयसच्या नावावर काही मिनिटंच टिकला. कारण लखनौ सुपरजायंट्स संघाने २७ कोटींची बोली लावून ऋषभला संघात घेतलं. ऋषभ आधीचे हंगाम दिल्लीकडून खेळला आहे. ऋषभला आपल्याकडे राखण्यासाठी दिल्लीचा संघ उत्सुक होता मात्र लखनौकडे अधिक पैसे असल्याने त्यांनी ऋषभला आपल्याकडे वळवलं.

आयपीएल लिलावात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतील अव्वल दोन खेळाडूंच्या संघात मुकाबला पाहायला मिळणार आहे.

IPL 2025, Lucknow Super Giants vs Punjab Kings Highlights: लखनौकडून खेळणाऱ्या ऋषभ पंतच्या संघासमोर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाबचं आव्हान असणार आहे.