Lucknow Super Giants beat Mumbai Indians by 18 runs : आयपीएल २०२४ च्या शेवटच्या सामन्यातही मुंबई इंडियन्सला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. लखनऊने मुंबईचा १८ धावांनी पराभव केला. वानखेडेवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने प्रथम खेळून २० षटकात २१४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ केवळ १९६ धावा करू शकला. मुंबईचा हा दहावा पराभव आहे. लखनऊचा हा सातवा विजय आहे. मुंबईकडून नमन धीरने २८ चेंडूत ६२ तर रोहित शर्माने ३८ चेंडूत ६८ धावा केल्या. मात्र, विजयासाठी हे पुरेसे नव्हते. लखनऊकडून रवी बिश्नोई आणि नवीन उल हकने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
चांगल्या सुरुवातीनंतर मुंबईचा डाव ढेपाळला –
लखनऊने दिलेल्या २१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली. कारण टीमने पॉवरप्ले ओव्हर्समध्ये एकही विकेट न गमावता ५३ धावा केल्या होत्या. नवव्या षटकात 23 धावा काढून बाद झालेल्या डेव्हाल्ड ब्रेविसला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. पहिल्या धक्क्यातून एमआय अजून सावरला नव्हता, तेव्हा सूर्यकुमार यादव शून्यावर बाद झाला. ११ व्या षटकात रोहित शर्माही ६८ धावांवर मोहसीन खानकरवी झेलबाद झाला.
मुंबईने अवघ्या ३२ धावांत ५ विकेट्स गमावल्या –
हार्दिक पंड्या आणि नेहाल वढेराही जास्त वेळ क्रीजवर टिकू शकले नाहीत. अशाप्रकारे मुंबईने अवघ्या ३२ धावांत ५ विकेट्स गमावल्या होत्या. संघाने विकेट न गमावता ८८ धावा केल्या होत्या, तर एमआयची धावसंख्या १५ षटकांत ५ बाद १२५ धावा होती. अखेरच्या ५ षटकांत संघाला विजयासाठी ९० धावांची गरज होती. शेवटच्या २ षटकात संघाला ५२ धावा करायव्या होत्या. इशान किशन आणि नमन धीर क्रीजवर उभे होते. १९व्या षटकात १८ धावा आल्या, त्यामुळे संघाला शेवटच्या ६ चेंडूंवर ३४ धावा करायच्या होत्या. नमन धीरने २८ चेंडूत ६२ धावांची खेळी खेळली, पण मुंबईला विजय मिळवून देण्यात यशस्वी झाला नाही.
हेही वाचा – MI vs LSG : स्टॉइनिसला खुन्नस दाखवणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची निकोलस पूरनने केली धुलाई, VIDEO होतोय व्हायरल
निकोलस पूरनच्या वादळी खेळीमुळे लखनऊने उभारला धावांचा डोंगर –
तत्पूर्वी नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सने २० षटकांत ६ गडी गमावून २१४ धावा केल्या. पहिल्या १० षटकांत लखनऊची धावसंख्या ३ गडी बाद ६९ धावा होती. मात्र, यानंतर निकोलस पूरनने अवघ्या २९ चेंडूंत ५ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ७५ धावा करत संघाला संकटातून बाहेर काढले. तर केएल राहुलने ४१ चेंडूत ५५ धावा केल्या. लखनऊने शेवटच्या १० षटकांत ३ चौकार आणि ३ षटकार खेचले. मुंबई इंडियन्सकडून नुवान तुषारा आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.