Lucknow Super Giants vs Sunrisers Hyderabad Score Updates : इंडियन प्रीमियर लीगच्या १६ व्या सीजनचा १० वा सामना आज शुक्रवारी सनरायझर्स हैद्राबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झाला. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियममध्ये दोन्ही संघ आमने-सामने आले होते. हैद्राबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या हैद्राबादच्या फलंदाजांची लखनऊच्या गोलंदाजांनी दाणादाण उडवली. क्रुणाल पांड्याने तीन तर अमित मिश्राने दोन विकेट्स घेतल्याने हैद्राबादला २० षटकांत १२१ धावांवरच मजल मारता आली होती. त्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार के एल राहुल आणि क्रुणाल पांड्याने धडाकेबाज फलंदाजी केली. राहुलने ३१ चेंडूत ३५ धावांची खेळी केली. तर क्रुणालने २३ चेंडूत ३४ धावा केल्या. मात्र, निकोलस पुरनने विजयी षटकार ठोकून लखनऊने १६ षटकांत १२७ धावा करत सामना खिशात घातला.
फजलहक फारुकीने धडाकेबाज फलंदाज केली मेयर्सला १३ धावांवर बाद केलं. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या दीपक हुड्डालाही धावांचा सूर गवसला नाही. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर हुड्डा अवघ्या सात धावांवर बाद झाला. परंतु, के एल राहुल आणि क्रुणाल पांड्याने सावध खेळी करत धावसंख्येची गती वाढवली. क्रुणाल पांड्याने आक्रमक खेळी करत २३ चेंडूत ३४ धावांची खेळी साकारली. क्रुणालच्या अष्टपैलू कामगिरीमुळं लखनऊच्या संघाला हैद्राबादवर विजय मिळवता आला. मार्कस स्टॉयनिस १० धावांवर नाबाद राहिला. हैद्राबादसाठी भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक आणि फारुकीला एका विकेटवर समाधान मानावं लागलं. तर आदिल राशिदने अप्रतिम गोलंदाजी करत दोन विकेट्स घेतल्या.
लखनऊकडून क्रुणाल पांड्याने हैद्राबादचा सलामीचा फलंदाज मयंक अग्रवालला ८ धावांवर बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर अनमोलप्रीत सिंगने हैद्राबादचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, सिंग ३१ धावांवर असताना पांड्याने त्यालाही बाद केलं. त्यानंतर रवी बिष्णोईच्या गोलंदाजीवर हॅरी ब्रुक अवघ्या तीन धावांवर बाद झाला अन् हैद्राबादची चौथी विकेट गेली. त्यानंतर राहुल त्रिपाठी आण वॉशिंग्टन सुंदरने सावध खेळी करत हैद्राबादच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवला होता. राहुल त्रिपाठीने ४१ चेंडूत ३५ धावांची खेळी साकारली तर सुंदरने २८ चेंडूत १६ धावा केल्या. अब्दुल समदने १० चेंडूत २१ धावा कुटल्या.