शुक्रवारी झालेल्या आयपीएल लढतीत लखनौनं मुंबईला नमवलं. सामन्यानंतर लखनौचे प्रशिक्षक जस्टीन लँगर पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकारांचे मोबाईल लँगर यांच्यासमोरच्या टेबलावर रेकॉर्डिंगसाठी ठेवले होते. त्यापैकी एका फोनवर कॉल आला. त्यानंतर जे घडलं ते गंमतशीर होतं.

लँगर बोलत असताना एका पत्रकाराच्या फोनवर आईचा कॉल आला. ‘आईचा फोन आहे, कोणाची तरी आई कॉल करते आहे. मी फोन उचलू का’? असं लँगर यांनी विचारलं. त्यांनी फोन उचलला आणि म्हणाले, ‘आई, रात्रीचे १२ वाजून गेलेत. मी पत्रकार परिषदेत आहे’, असं बोलून लँगर यांनी कॉल ठेवला आणि हॉलमध्ये हास्यकल्लोळाची लाट उसळली.

फोन ठेवताच लँगर यांनी मयांक यादवबद्दल बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, ‘मयांक यादव हा लखनौ सुपरजायंट्स संघाचा महत्त्वपूर्ण शिलेदार आहे. मयांकच्या भन्नाट वेगाने सगळ्यांना प्रभावित केलं. मात्र दुखापतीमुळे मयांक त्या हंगामात खेळू शकला नाही. आताही दुखापतीमुळे तो बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकादमीमध्येच आहे. मयांकची तब्येत वेगाने सुधारतो आहे. भारतीय क्रिकेट आणि आयपीएलसाठी ही चांगली गोष्ट आहे. एनसीएमध्ये तो गोलंदाजी करत असल्याचा व्हीडिओ मी काल पाहिला. ९० ते ९५ टक्के क्षमतेने तो गोलंदाजी करतो आहे. तो काय करू शकतो हे आपण गेल्या हंगामात पाहिलं. तूर्तास तरी भारतीय क्रिकेटमध्ये त्याच्या इतक्या वेगाने गोलंदाजी करणारं कोणी नाहीये. म्हणूनच त्याच्या नावाची चर्चा आहे. त्याच्या पुनरागमनाबद्दल सतत बोललं जात आहे. तो लवकरच पुनरागमन करेल’.

पाठीचं दुखणं बळावल्यामुळे मयांकला एनसीएमध्ये जावं लागलं. तिथेच उपचार आणि रिहॅब प्रक्रिया सुरू आहे. मयांक कुठल्या सामन्यापासून खेळू शकेल याबाबत लँगर यांनी तपशील दिले नाहीत.

‘मयांकच्या पुनरागमनात एनसीएची भूमिका मोलाची आहे. अवेश खान आणि आकाशदीप दोघेही एनसीएमध्येच होते. तिथेच रिहॅब प्रक्रिया पूर्ण करून ते परतले आहेत. लवकरच मयांकही परतेल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

२१ वर्षीय मयांकने गेल्या वर्षी सुसाट वेगाने गोलंदाजीसह दणका उडवून दिला होता. मयांक ताशी १५० किमी वेगाने गोलंदाजी करत होता. वेगासह अचूकता आणि विकेट्स पटकावण्याची हातोटी यामुळे मयांक क्रिकेटवर्तुळात लोकप्रिय ठरला. मयांकसह अवेश, आकाशदीप दुखापतग्रस्त असल्याने लखनौची गोलंदाजी कमकुवत झाली होती. मोहसीन खान दुखापतीमुळे स्पर्धेतच खेळू शकणार नाहीये. त्याच्याऐवजी संधी मिळालेल्या अनुभवी शार्दूल ठाकूरने चमकदार कामगिरी केली आहे.