Mahendra Singh Dhoni likely to play last season this year: आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा आतापर्यंतचा प्रवास चांगला राहिला आहे. संघाने ८ सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी पाच जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत. या संघाने आपल्या घरच्या मैदानावर आतापर्यंत फक्त तीन सामने खेळले आहेत, परंतु हा संघ जिथे सामना खेळतो तिथे स्टेडियम पिवळ्या रंगाने भरून जात आहे. यामागे एकमेव कारण आहे, ते म्हणजे महेंद्रसिंग धोनी.
आयपीएल २०२३ हा धोनीचा शेवटचा हंगाम असू शकतो –
आयपीएलचा हा हंगाम धोनीचा शेवटचा आयपीएल हंगाम मानला जात आहे. खुद्द माहीने याबाबत अद्याप काहीही सांगितलेले नाही, पण चेन्नईत शेवटचा सामना खेळल्यानंतर धोनी आयपीएलला अलविदा करेल असे मानले जात आहे. धोनी प्रत्येक सामन्यासोबत निवृत्तीचे काही संकेत देत आहे.
धोनी प्रत्येक सामन्यात देत आहे संकेत –
सामन्यानंतरच्या सादरीकरणातील त्याच्या पहिल्या कामापासून ते त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे यश धोनीच्या लक्षात आहे. धोनीने याच मैदानावर वानखेडे स्टेडियमवर २०११ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या विश्वचषकातील विजयाच्या आठवणी सांगितल्या. यानंतर धोनी जेव्हा कोलकात्याच्या ईडन गार्डनवर पोहोचला तेव्हा त्याला खगरपूरची आठवण झाली, जिथे तो टीसी म्हणून काम करत असे.
धोनीला राजस्थानमध्ये आठवली नाबाद १८३ धावांची खेळी –
यानंतर जेव्हा चेन्नई सुपर किंग्जचा संघ राजस्थानच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर उतरला तेव्हा येथेही धोनीने चाहत्यांना त्याच्या नाबाद १८३ धावांची आठवण करून दिली. धोनीने या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध १८३ धावा केल्या होत्या, जी त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. धोनीचे हे शब्द चाहत्यांना अधिक विचार करायला भाग पाडत आहेत की, हा धोनीचा शेवटचा आयपीएल हंगाम असेल का?
चेन्नई सुपर किंग्ज संघाची यंदाच्या हंगामातील कामगिरी –
चेन्नई सुपर किंग्ज संघ गेल्या मोसमात नवव्या स्थानावर होता. मात्र, यावेळी त्याने चांगले पुनरागमन केले आहे. आतापर्यंत या संघाने ८ सामने खेळले आहेत, त्यापैकी पाच जिंकले आहेत आणि तीन सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. चेन्नईशिवाय गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्सचेही प्रत्येकी १० गुण आहेत. गुणतालिकेत राजस्थान पहिल्या आणि गुजरात दुसऱ्या स्थानी आहे. त्याचबरोबर चेन्नईचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.