हैदराबाद : सनरायजर्स हैदराबादसमोर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये गुरुवारी गुणतालिकेत अग्रस्थानी असणाऱ्या राजस्थान रॉयल्सचे आव्हान असणार आहे. यावेळी त्यांचा प्रयत्न विजयी पुनरागमन करण्याचा असेल.
राजस्थानचे ‘प्लेऑफ’मधील स्थान जवळपास निश्चित आहे. मात्र, हैदराबादला आगेकूच करायची झाल्यास चांगली कामगिरी करावी लागेल. काही दिवसांपूर्वी चांगल्या लयीत असलेल्या हैदराबादला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु व चेन्नई सुपर किंग्ज संघांकडून धावांचा पाठलाग करताना पराभूत व्हावे लागले. त्यामुळे हैदराबादला शीर्ष चार संघांतून बाहेर पडावे लागले. पाच विजय व चार पराभवांनंतर हैदराबाद संघ १० गुणांसह पाचव्या स्थानी आहे. त्यामुळे या सामन्यात हैदराबादने विजय मिळवल्यास त्यांचा आत्मविश्वास दुणावेल. मात्र, लयीत असलेल्या राजस्थान संघाला नमवणे आव्हानात्मक असेल.
हैदराबादच्या फलंदाजांचा कस
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाच्या शीर्ष व मध्यक्रमातील फलंदाजांना आव्हानाचा पाठलाग करताना चमक दाखवता आलेली नाही. हैदराबादने या हंगामात प्रथम फलंदाजी करताना दोनदा २५०हून अधिक धावसंख्या उभारली. मात्र, लक्ष्याचा पाठलाग करतेवळी त्यांना एकदाही २००हून अधिक धावसंख्या गाठता आलेली नाही. हैदराबादकडे ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक वर्मासारखे आक्रमक सलामीवीर आहेत आणि संघ चांगल्या सुरुवातीसाठी त्यांच्यावर अवलंबून आहे. दोघेही लवकर बाद झाल्यास हैदराबादच्या इतर फलंदाजांना अडचणी येतात. हैदराबादच्या एडीन मार्करम, हेन्रिक क्लासन यांना कामगिरी उंचवावी लागेल. तर, गोलंदाजीत कमिन्स, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार व शाहबाझ अहमद यांच्यावर संघाची जबाबदारी असेल.
हेही वाचा >>> CSK vs PBKS : पंजाब किंग्जचा ७ विकेट्सनी दणदणीत विजय, पराभवाच्या धक्क्याने चेन्नई सुपर किंग्जची वाढली डोकेदुखी
बटलर, सॅमसन, यशस्वीवर मदार
राजस्थान रॉयल्सने या हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. संघाकडे जोस बटलर, यशस्वी जैस्वाल व कर्णधार संजू सॅमसनसारखे आक्रमक फलंदाज आहेत. हे सर्व फलंदाज सध्या चांगल्या लयीत आहेत. या त्रिकुटाशिवाय शिम्रॉन हेटमायर व रोव्हमन पॉवेल यांच्यासह रियान पराग व ध्रुव जुरेल यांनीही धावा केल्या आहेत. बटलर व जैस्वाल यांनी या हंगामात शतकी खेळी देखील केल्या आहेत. त्यामुळे या दोघांना रोखण्याचे आव्हान हैदराबादच्या गोलंदाजासमोर असणार आहे. फलंदाजीप्रमाणे संघाची गोलंदाजीही मजबूत आहे. ट्रेंट बोल्ट, आवेश खान तसेच, संदीप शर्मा असे चांगले गोलंदाज संघाकडे आहेत. यामध्ये बोल्ट व शर्मा यांनी संघाच्या विजयात निर्णायक भूमिका पार पाडली आहे. यासह लेग स्पिनर यजुवेंद्र चहलही प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अडचणीत आणण्यात सक्षम आहे.
* वेळ : सायं. ७.३० वा. * थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा अॅप.