LSG vs MI Match Updates: मुंबई इंडियन्सविरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स हा सामना लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळवला जात आहे. मुंबईने प्रथम फलंदाजी करत १४४ धावा केल्या आहेत. लखनऊच्या गोलंदाजांनी या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. पण संघाचा वेगवान गोलंदाज सामना सुरू असतानाच बाहेर गेला. भेदक वेगवान गोलंदाज मयंक यादव, जो दुखापतीनंतर पुनरागमन करत सामना खेळत होता, त्याने पुन्हा एकदा मैदान सोडले. मयंकने आपले षटकही पूर्ण केले नाही.
मयंक यादवला मुंबईविरूद्धच्या सामन्यात पुन्हा झाली दुखापत?
आयपीएल २०२४ मध्ये, सध्या आपल्या वेगामुळे चर्चेत असलेला वेगवान गोलंदाज मयंक यादवने केवळ दोन सामने खेळले आणि यातच त्याल दुखापत झाली. त्यानंतर त्याने मुंबईविरुद्धच्या सामन्यात पुनरागमन केले. या पुनरागमनाच्या सामन्यात मयंक नेहमीसारका फॉर्मात दिसत नव्हता, पण तरीही त्याने एक विकेट मिळवली. आता या सामन्यात मयंक पुन्हा एकदा सामना मध्यावर सोडून पॅव्हेलियनमध्ये परतला.
डावातील १९वे षटक टाकणाऱ्या मयंकने केवळ १ चेंडू टाकला आणि त्यानंतरच तो मैदानाबाहेर जाताना दिसला. मात्र, मयंकबाबत अद्याप कोणतेही अधिकृत अपडेट आलेले नाही. एमआय विरुद्धच्या सामन्यात मयंकने ३.१ षटकांत ३१ धावा देत १ विकेट घेतली.
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात मयंक यादवचा वेगही कमी दिसत होता. सुरुवातीला ताशी १५० किमी वेगाने गोलंदाजी करणाऱ्या मयंकने मुंबई इंडियन्सविरुद्ध ताशी १४७ किमीपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी केली नाही. तर, याआधी तो १५० च्या सरासरी वेगाने गोलंदाजी करत होता आणि त्याने १५६.७ किमी वेगाने सर्वात वेगवान चेंडू टाकला होता.