इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) संयोजनासाठी दुबईत कार्यरत असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वैद्यकीय पथकातील एका सदस्याला गुरुवारी करोनाची लागण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गेल्या आठवडय़ात चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या दोन खेळाडूंसह एकूण १३ जणांना करोनाची लागण झाली होती. त्यांना सध्या १४ दिवसांच्या अनिवार्य विलगीकरणाला सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या दोन सदस्यांनाही करोनाची लागण झाली आहे.
आज ‘आयपीएल’च्या वेळापत्रकाची घोषणा
नवी दिल्ली : ‘आयपीएल’बहुप्रतीक्षित वेळापत्रक शुक्रवारी (४ सप्टेंबरला) जाहीर करण्यात येणार आहे, असे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने दिले आहेत. ‘‘वेळापत्रकाला उशीर झाला आहे, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. प्रस्तावित वेळापत्रकातील समस्यांचे निराकरण करून त्याला अंतिम स्वरूप दिले जात आहे,’’ असे गांगुलीने सांगितले. ‘आयपीएल’ प्रशासकीय समितीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल शुक्रवारी दुबईत वेळापत्रक जाहीर करतील. परंतु ते संपूर्ण वेळापत्रक जाहीर करतील की फक्त टप्प्याटप्प्याने हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.
कौटुंबिक कारणास्तव रिचर्ड्सनची माघार
साऊदम्पटन : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्ड्सनने ‘आयपीएल’मधून माघार घेतली आहे. सध्या करोनाच्या साथीमुळे प्रवासाचे निर्बंध कडक करण्यात आले आहेत. या परिस्थितीत पहिल्या अपत्याच्या जन्माचे साक्षीदार होता यावे, या इराद्याने त्याने येत्या ‘आयपीएल’ हंगामात खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या ‘आयपीएल’च्या लिलावात २९ वर्षीय रिचर्ड्सनला रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुने चार कोटी रुपये रकमेला खरेदी केले होते. बेंगळूरु संघाने त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाचा लेग-स्पिनर अॅडम झम्पाला संघात स्थान दिले आहे.