IPL 2025 MI vs CSK Rohit Sharma Back in Form: रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवच्या शतकी भागीदारीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सलग तिसरा विजय मिळवला आहे. रोहित शर्माच्या वादळी खेळीची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेरीस चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध सामन्यात रोहितची बॅट तळपली. सलामीला आलेला रोहित शर्मा मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देतच माघारी परतला. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने १०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी रचत चेन्नईवर तब्बल ९ विकेट्सने मोठ्या विजयाची नोंद केली आहे.
चेन्नईने प्रथम फलंदाजी करत ५ विकेट्स गमावत १७६ धावा केल्या. मुंबई इंडियन्सने पहिल्या डावात उत्कृष्ट फिल्डिंग करत चेन्नईला कमी धावसंख्येवर अडवले. तर प्रत्युत्तरात रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने ५४ चेंडूत ११४ धावांची खेळी करत मुंबई इंडियन्सला एकतर्फी विजय मिळवून दिला आहे.
रोहित शर्माने या सामन्यात दमदार खेळी केली आणि त्याच्या संघासाठी धावांचा पाठलाग करणं सोपं केलं. रोहितने या हंगामातील पहिले अर्धशतक झळकावले. रोहित शर्माचं फॉर्मात परतणं हे संघासाठी खूप महत्त्वाचं असणार अआहे. रोहित शर्मा व्यतिरिक्त सूर्यकुमार यादवनेही अर्धशतक झळकावले. रोहितने नाबाद ७६ आणि सूर्याने नाबाद ६८ धावा केल्या आणि मुंबईने हा सामना ९ विकेट्सने जिंकला.
मुंबई इंडियन्सची टॉप फलंदाजी फळी तुफान फॉर्मात आली असून मुंबईने यंदाच्या मोसमातील विजयाची हॅटट्रिक लगावली आहे. चेन्नईने दिलेल्या १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरूवात कमाल झाली. रायन रिकल्टनने पहिल्याच षटकात २ चौकार लगावत सुरूवात केली. रायन रिकल्टन १९ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह २४ धावा करत बाद झाला.
यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने मुंबईच्या विजयाची जबाबदारी घेतली. रोहित शर्मा ४५ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकारांसह ७६ धावा करत नाबाद माघारी परतला. तर सूर्यकुमार यादवने ३० चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांसह ६८ धावांची नाबाद खेळी केली आणि १५.४ षटकांत संघाला शानदार विजय मिळवून दिला. यासह मुंबई इंडियन्सचा संघ ८ गुणांसह सहाव्या स्थानी पोहोचला आहे.
चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजीला फारशी चांगली सुरूवात झाली नाही. चेन्नईने ११ षटकांत ३ गडी गमावून फक्त ७३ धावा करता आल्या. यानंतर, रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे यांनी अर्धशतकं झळकावली आणि त्यांच्या संघाला या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. शिवम दुबेने ३२ चेंडूत ५० धावा केल्या. तर, रवींद्र जडेजा ३५ चेंडूत ५३ धावा करून नाबाद राहिला.
याशिवाय, १७ वर्षीय आयुष म्हात्रेने १५ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. सलामीवीर शेख रशीदनेही १९ धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक २ विकेट घेतले. दीपक चहर, अश्विनी कुमार आणि मिचेल सँटनर यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.