MI vs LSG Match Highlights in Marathi: जसप्रीत बुमराहच्या ४ विकेट्सच्या जोरावर मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजीचं कंबरड मोडलं. यासह मुंबईने लखनौचा वानखेडेच्या मैदानावर ५४ धावांनी मोठा पराभव केला आहे. यासह मुंबई इंडियन्सने यंदाच्या मोसमातील सलग पाचवा विजय मिळवला आहे. मुंबईने लखनौला विजयासाठी २१६ धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर लखनौचा संघ २० षटकांत फक्त १६१ धावा करत क्लीन बोल्ड झाला.

संपूर्ण संघ तुफान फॉर्मात असलेल्या मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्स संघावर ५४ धावांनी मोठा विजय मिळवला आहे. या मोठ्या विजयासह मुंबईचा नेट रन रेट वाढला असून चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा संघ १२ गुणांसह थेट दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

मुंबई इंडियन्सने दिलेल्या २१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. मिचेल मार्श आणि एडन मारक्रम यांनी फटकेबाजी केली खरी, पण तिसऱ्या षटकात बुमराहने संघाला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला. एडन मारक्रम ९ धावा करत बाद झाला. तर मिचेल मार्श ३४ धावा करत बाद झाला. निकोलस पुरन आणि मार्शने पॉवरप्लेमध्ये संघाला ६० धावांचा टप्पा गाठून दिला. पण विल जॅक्सने पुरन आणि पंतला एका षटकात बाद करत सामना मुंबईच्या बाजूने फिरवला.

आयुष बदोनीने संघाचा डाव सावरला, पण मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी फलदाजांना सामन्यात परतण्याची फारशी संधी दिली नाही. आयुष बदोनी २२ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह ३५ धावा करत बाद झाला. लखनौकडून ही फलंदाजाची सर्वाधिक धावसंख्या होती. याशिवाय रवी बिश्नोईने १३ धावा केल्या.

जसप्रीत बुमराहने १६व्या षटकात मिलर, अब्दुल समद व आवेश खानला क्लीन बोल्ड करत ३ विकेट्स घेतल्या आणि मुंबईचा विजय निश्चित केला. यानंतर मुंबईकडून पदार्पण करणाऱ्या कार्बिन बॉशने १९व्या षटकात बिश्नोईला क्लीन बोल्ड करत पहिली आयपीएल विकेट मिळवली. तर बोल्टने अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर दिग्वेश राठीला क्लीन बोल्ड करत लखनौला १६१ धावांवर क्लीन बोल्ड केलं. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट्स घेतले, तर ट्रेंट बोल्टने ३, विल जॅक्सने २ आणि कॉर्बिन बॉशने १ विकेट घेतली.

लखनौने नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्सला फलंदाजीसाठी पाचारण केलं. रायन रिकल्टन आणि रोहित शर्माने चांगली फटकेबाजी करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. पण रोहित शर्मा २ षटकारांसह १२ धावा करत झेलबाद झाला. पण यानंतर रायन रिकल्टनने संघाचा डाव सावरला. रिकल्टने ३२ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांसह ५८ धावा करत झेलबाद झाला. तर विल जॅक्स २९ धावा करत बाद झाला.

यानंतर सूर्यकुमार यादवने जबाबदारी घेत २८ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटाकारांसह ५४ धावा केल्या. यासह सूर्याने यंदाच्या सीझनची ऑरेंज कॅपदेखील मिळवली आहे. तिलक वर्मा आणि हार्दिक मोठी धावसंख्या रचू शकले नाहीत. नमन धीर आणि कार्बिन बॉश यांनी महत्त्वपूर्ण धावा केल्या. नमन धीरने ११ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २५ धावा तर कार्बिनने १० चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह २० धावा करत मुंबईची धावसंख्या २१५ वर नेली.