Michael Clarke’s statement about Mumbai Indians : मोठ्या स्पर्धा जिंकणे हे वैयक्तिक प्रतिभेऐवजी संघ म्हणून एकजुटीने कामगिरी करण्यावर अवलंबून असते, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने व्यक्त केले. मुंबई इंडियन्सचा संघ गटांमध्ये विभागला गेला आहे, ज्यामुळे खेळाडूंना एकजुटीने कामगिरी करण्यात अडथळा येत आहे, असे त्याचे मत आहे. हंगामापूर्वी अचानक कर्णधार बदलल्याने पाचवेळा चॅम्पियन संघात निराशा आहे, रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याकडे नेतृत्व देण्यात आले आहे.
मायकल क्लार्क काय म्हणाला?
‘स्टार स्पोर्ट्स क्रिकेट लाइव्ह’ या कार्यक्रमात बोलताना मायकल क्लार्क म्हणाला, ‘मला वाटते की आपण बाहेरून जे पाहतो, त्यापेक्षा बरेच काही आत घडत आहे. त्यामुळे इतके चांगले खेळाडू असूनही, आपण अशा कामगिरीमध्ये सातत्य कमी ठेवू शकत नाही. मला वाटते की त्या ड्रेसिंग रूममध्ये वेगवेगळे गट आहेत. त्यामुळे काही गोष्टी साध्या होत नाहीत. ते संघटित होऊ शकत नाहीत, या कारणााने ते एक संघ म्हणून खेळू शकत नाहीत.
विशेष म्हणजे मुंबई इंडियन्स संघात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, टीम डेव्हिड आणि जसप्रीत बुमराह यांसारखे अनुभवी खेळाडू असूनही, संघ विजयासाठी संघर्ष करत आहे. मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत १० पैकी ७ सामने गमावले असून ३ जिंकले आहेत. संघाच्या या तीन विजयांचे श्रेय वेगवान गोलंदाज बुमराह आणि रोमारियो शेफर्ड यांच्या वैयक्तिक कौशल्यांना दिले जाऊ शकते.
मुंबई इंडियन्स गुणतालिकेत ९व्या क्रमांकावर –
मायकेल क्लार्क पुढे म्हणाला, “मला वाटते की मोठ्या स्पर्धा जिंकण्यासाठी तुम्हाला वैयक्तिक कामगिरीची गरज नसून सांघिक कामगिरीची गरज आहे. मात्र, दुर्दैवाने मुंबई इंडियन्स अजून पर्यंत एक संघ म्हणून चांगले खेळले नाहीत. म्हणून मला आशा आहे की, ते यामध्ये बदल करु शकतील.” गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर असलेल्या मुंबई संघाला मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धही पराभव पत्करावा लागला. मोसमातील पहिले तीन सामने गमावल्यानंतर मुंबईने सलग दोन सामने जिंकले होते. मात्र त्यानंतर ५ सामन्यात संघाला फक्त एकच विजय मिळवता आला आहे.