Hardik Pandya Statement about Rohit Sharma : आयपीएल २०२४ चा हंगाम सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. पहिला सामना शुक्रवारी म्हणजेच २२ मार्च रोजी होणार आहे. चेन्नईत पहिल्या दिवशी आरसीबी आणि सीएसकेचे संघ आमनेसामने येतील. दरम्यान, ५ वेळा आयपीएल चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्सची तयारीही जोरात सुरू आहे. यावेळी संघाची कमान हार्दिक पंड्याकडे असणार आहे. आता, आयपीएलच्या हंगामाच्या अवघ्या ४ दिवस आधी, हार्दिक पंड्याने एमआयचा माजी कर्णधार रोहित शर्माबद्दल मोठे विधान केले आहे.
आगामी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांच्यासमवेत पत्रकार परिषदेला संबोधित करताना, मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला की त्याने मुंबई फ्रँचायझीचे नेतृत्व करण्याचा विचार कधीच केला नव्हता, ज्यांच्यासोबत त्याने आपल्या आयपीएल कारकीर्दीचा प्रवास सुरू केला होता.
संपूर्ण हंगामात रोहितचा हात माझ्या खांद्यावर असेल –
रोहित शर्माबद्दल बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला, “यंदाच्या हंगामात काही वेगळे होणार नाही. जेव्हा जेव्हा मला मदतीची आवश्यकता असेल, तेव्हा तो तेथे असेल. तो भारतीय कर्णधार असल्याचे मी यापूर्वीही सांगितले आहे. मी जवळपास माझी संपूर्ण कारकीर्द त्याच्या कर्णधारपदाखाली घालवली आहे. कोणत्याही प्रकारची अस्वस्थता असेल असे मला वाटत नाही. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने जे काही साध्य केले ते मला पुढे घेऊन जायचे आहे. त्यामुळे मला माहित आहे की संपूर्ण हंगामात त्याचा हात माझ्या खांद्यावर असेल.”
चाहते जे काही बोलतात ते बोलण्याचा त्यांना पूर्ण अधिकार –
हार्दिक पंड्या पुढे म्हणाला, ‘खर सांगायचे तर आम्ही चाहत्यांचा आदर करतो, त्याचवेळी आम्ही खेळावर लक्ष केंद्रित करतो. मी चाहत्यांचा खूप आभारी आहे. चाहते जे काही बोलतात ते बोलण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे, मी त्याच्या मताचा आदर करतो. तसेच, चांगली कामगिरी करण्यावर आमचा भर असेल.”
हेही वाचा – Ravichandran Ashwin : तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनकडून अश्विनचा गौरव! १ कोटी रुपयांसह ५०० सोन्याची नाणी भेट
पोलार्ड आणि मलिंगाबद्दल काय म्हणाला हार्दिक पंड्या?
किरॉन पोलार्ड आणि लसिथ मलिंगाबद्दल बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला, मी किरॉन पोलार्ड आणि लसिथ मलिंगाबरोबर काम करण्यास उत्सुक आहे. पुन्हा एकदा दोघांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मी आनंदी आहे. माझा आतापर्यंतचा प्रवास अप्रतिम राहिला. तसेच मी येथून पुढे सुरु होणाऱ्या प्रवासासाठी खूप उत्सुक आहे.