Nita Ambani on Rohit Sharma Captaincy: आयपीएलच्या १८ व्या हंगामातही मुंबई इंडियन्सला अद्याप सूर गवसलेला नाही. मागच्या वर्षी मुंबई इंडियन्सने पाच वेळा चषक जिंकवून देणाऱ्या रोहित शर्माला बाजूला करून हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद दिलं होतं. यावर्षीही हार्दिक कर्णधार आहे. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला फारसी चमक दाखवता आलेली नाही. या हंगामात पाच पैकी चार सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झालेला आहे. अशातच दरवर्शीप्रमाणे नीता अंबानी या शिर्डी येथे साई दर्शनासाठी गेल्या असताना तेथील एका चाहत्याने रोहित शर्माला कर्णधार करावे, अशी मागणी केली. त्यावर नीता अंबानी यांनी भन्नाट उत्तर दिले.

हार्दिक पंड्याकडे कर्णधार पद दिल्यानंतर २०२४ चा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी अतिशय वाईट ठरला होता. १४ पैकी १० सामने गमावून मुंबई इंडियन्सचा संघ शेवटच्या दहाव्या क्रमाकांवर होता. यावर्षीही मुंबईची सुरुवात म्हणावी तितकी चांगली झालेली नाही.

याआधीही सोशल मीडियावर अनेकांनी रोहित शर्माकडे पुन्हा कर्णधारपद देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. मात्र नीता अंबानी यांना आता थेट चाहत्याच्याच प्रश्नाला सामोरे जावे लागले आहे.

चाहत्याने मागणी केल्यानंतर नीता अंबानी म्हणाल्या…

नीता अंबानी साई मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात असताना रांगेत उभ्या असलेल्या एका चाहत्याने “मॅडम, रोहित शर्माला कॅप्टन करा…”, अशी दोन ते तीन वेळा ओरडून मागणी केली. यावेळी माध्यमांचे कॅमेरे तसेच अनेक लोक मोबाइलमधून हा प्रसंग रेकॉर्ड करत होते. नीता अंबानी यांना थेट अशी मागणी केल्यानंतर त्यांनीही स्मितहास्य करत एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. “बाबा की मर्जी”, अशी टिप्पणी करत नीता अंबानी या चाहत्याला उत्तर दिले.