आयपीएलच्या १५ व्या हंगामातील २४ वा सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन तगड्या संघांमध्ये खेळवला गेला. दोन्ही संघ तूल्यबळ असल्यामुळे ही लढत चांगलीच अटीतटीची ठरली. मात्र, कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने हा सामना जिंकला. यात हार्दिक पांड्याने चमकदार कामगिरी केली. त्याच्या तुफान फलंदाजी आणि तेवढ्याच चपळ क्षेत्ररक्षणानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस आला. यातील अनेक नेटकऱ्यांनी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गमावून हिरा गमावल्याची प्रतिक्रिया व्यक्त केलीय. काहींनी तर पांड्या बंधुंना संघात न घेऊन मुंबई इंडियन्सने दोन हिरे गमावल्याचं मत व्यक्त केलंय.
राजस्थान रॉयल्सविरुद्ध हार्दिक पांड्याने ५२ चेंडूत नाबाद ८७ धावांची दमदार खेळी केली. त्याच्या या खेळीच्या मदतीने गुजरात टायटन्सने तब्बल १९२ धावांची मोठी धावसंख्या उभी केली. पांड्याने ४ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने तुफान खेळी केली.
सोशल मीडियावरील नेटकऱ्यांच्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया…
एका नेटकऱ्याने म्हटलं, “प्रत्येक सामन्यात हार्दिक पांड्या खेळतो आहे. तो हाय रेटेड खेळाडू का आहे हे त्याने सिद्ध केलंय. मुंबई इंडियन्सने निश्चितपणे हिरा गमावला आहे.
तुमच्याकडे एखादी अमुल्य गोष्ट असेल तर तुम्हाला त्याची जाणीव नसते, पण जेव्हा ती अमुल्य गोष्ट जाते तेव्हा तुम्हाला त्याचं महत्त्व कळतं. पांड्या बंधुंची मुंबई इंडियन्समधील गैरहजेरी जाणवतेय. आपण हिरे गमावले आहेत.
दरम्यान, क्षेत्ररक्षणातही हार्दिक पांड्याने आपली चपळाई सिद्ध केली. हार्दिक पांड्याने स्टंप्सवर चेंडू डायरेक्ट हीट करत राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला धाबवाद केलं. विशेष म्हणजे हार्दिकने फेकलेला चेंडू अतिशय वेगात असल्यामुळे स्टंप थेट तुटला. हार्दिकच्या डायरेक्ट हीटने स्टंप तुटल्यामुळे सामना काही काळासाठी थांबवावा लागला.
राजस्थानने दिलेले १९२ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी सलामीला जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल आले. मात्र दुसऱ्याच षटकात देवदत्त पडिक्कलचा त्रिफला उडाल्यामुळे तो शून्यावर बाद झाला. त्यानंतर राजस्थानच्या ५६ धावा असताना रविचंद्रन अश्विन झेलबाद झाला. तसेच अर्धशतकी खेळी करुन जोस बटलरदेखील ५४ धांवावर त्रिफळाचित झाला. राजस्थानचे गडी ठराविक अंतरावर बाद होत गेले. दरम्यान, हार्दिक पांड्याने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला थरारक पद्धतीने धावबाद केले.
हेही वाचा >> ‘गॉड ऑफ क्रिकेट’ची जादू कायम! भर मैदानात पंजाबच्या कोचने सचिनचे धरले पाय, पाहा नेमकं काय घडलं?
राजस्थानच्या ७४ धावा झालेल्या असताना संजू सॅमसनने लोकी फर्ग्यूसनने टाकलेल्या चेंडूवर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र हार्दिक पांड्याने चपळाई दाखवत सॅमसन क्रीजमध्ये पोहोचायच्या आत चेंडू स्टंप्सवर डायरेक्ट हीट केला. चेंडू थेट स्टंप्सवर लागल्यामुळे स्टंप तुटला. ज्यामुळे सामना साधारण पाच ते दहा मिनिटे थांबवावा लागला. नवा स्टंप लावल्यानंतर सामना पुन्हा एकदा सुरु करण्यात आला.