Mumbai Indians beat Delhi Capitals : आयपीएल २०२४ मधील २०वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने आले होते, ज्यामध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर २९ धावांनी मात करत यंदाच्या हंगामातील आपला विजय नोंदवला. त्याचबरोबर आपल्या गुणांचे खातेही उघडले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने रोमारियो शेफर्डच्या २० व्या षटकातील वादळी खेळीच्या जोरावर दिल्लीला २३५ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ २० षटकांत ८ बाद २०५ धावाच करु शकला.
ट्रिस्टन स्टब्सची ७१ धावांची खेळी ठरली व्यर्थ –
लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीकडून पृथ्वी शॉने ४० चेंडूत ६६ धावांची खेळी केली, तर अभिषेक पोरेल (४१) आणि ट्रिस्टन स्टब्सची महत्त्वपूर्ण खेळीही संघाला विजयापर्यंत नेऊ शकली नाही. ट्रिस्टन स्टब्सने २५ चेंडूत ७१ धावांची नाबाद खेळी खेळली. १५ षटकांनंतर दिल्ली कॅपिटल्सची धावसंख्या ३ गड्यांच्या मोबदल्यात १४४ धावा होती आणि त्यांना विजयासाठी पुढील ५ षटकांत ९१ धावा करायच्या होत्या. १६ व्या षटकात केवळ ९ धावा आल्या आणि ऋषभ पंतच्या विकेटमुळे दिल्ली कॅपिटल्स बॅकफूटवर गेली. पण ट्रिस्टन स्टब्स अजूनही क्रीजवर होता आणि परिस्थिती अशी होती की डीसीला शेवटच्या ३ षटकात ६३ धावा हव्या होत्या.
जसप्रीत बुमराहने १७ व्या षटकात फक्त ८ धावा दिल्या, त्यामुळे एमआयचा विजय जवळपास निश्चित झाला. कारण दिल्लीला शेवटच्या १२ चेंडूत ५५ धावा करायच्या होत्या. शेवटच्या दोन षटकांत मुंबईच्या गोलंदाजांनी सामन्यावर नियंत्रण ठेवले होते, त्यामुळे डीसीला २९ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. अखेरच्या षटकात जेराल्ड कोएत्झीने दिल्लीच्या ३ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवून आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत ५ गडी गमावून २३४ धावा केल्या. एके काळी मुंबईची धावसंख्या १७ षटकांत ४ गडी बाद १६७ धावा होती. यानंतर डेथ ओव्हर्समध्ये टीम डेव्हिड आणि रोमारियो शेफर्ड यांच्या तुफानी फलंदाजीमुळे मुंबईला एवढी मोठी धावसंख्या गाठता आली. मुंबईने शेवटच्या पाच षटकात ९६ धावा केल्या. रोमारियो शेफर्डने एनरिक नॉर्टजेच्या २०व्या षटकात ३२ धावा काढल्या, जे दिल्लीच्या पराभवाचे कारण ठरले.