Mitchell Starc Takes Sly Dig At Critics : कोलकत्ता नाइट रायडर्सचा (KKR) वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने आयपीएल २०२४ च्या ५१ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. त्याने ३.५ षटकांमध्ये ३३ धावांत चार गडी बाद केले आणि वानखेडे स्टेडियमवर केकेआरला २४ धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. एमआयला १७० धावांचे लक्ष्य पार करायचे होते. मात्र, स्टार्कच्या भेदक गोलंदाजीने टीम डेव्हिड, पीयूष चावला व जेराल्ड कोएत्झी यांना एकाच षटकामध्ये माघारी परतण्यास भाग पडले. अशा प्रकारे आयपीएलमध्ये केकेआरने वानखेडे स्टेडियमवर १२ वर्षांनंतर एमआयविरुद्ध विजय मिळवला.
पण, आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू असलेल्या स्टार्कची या हंगामामधील या सामन्यापूर्वीची कामगिरी तितकीशी चांगली नव्हती. त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका केली जात होती आणि त्याला समाजमाध्यमांवर ट्रोलिंगचा सामना करावा लागत होता. ऑस्ट्रेलियाच्या या ३४ वर्षांच्या गोलंदाजाचा या सीजनमधील इकॉनॉमी रेट ११.४० आहे; जो सीझनमधील खूप खराब रेट मानला जातो. पण, त्यामुळे होणाऱ्या टीकेकडे स्टार्कने स्वत:चे लक्ष जास्त विचलित होऊ दिले नाही. पण, आता केकेआर आणि मुंबई इंडियन्सच्या सामन्यानंतर स्टार्कने आपल्या जबरदस्त खेळानंतर ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. “मी एकमेव गोलंदाज नाही; ज्याच्याविरोधात आयपीएलमध्ये धावा बनत आहेत”, असे तो म्हणाला.
केकेआरविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत स्टार्क म्हणाला, “जास्त धावा करणारे गोलंदाज कमी आहेत का? असे आहे का?पण केकेआरचा आतापर्यंतचा प्रवास छान राहिला आहे. आम्ही दुसऱ्या स्थानावर असून, खरोखर चांगली कामगिरी करीत आहोत. हे टी-२० क्रिकेट आहे; जिथे गोष्टी नेहमी तुमच्या इच्छेनुसार होत नाहीत. अर्थातच, मला नेहमी सुरुवातीला चांगला परफॉर्म करायला आवडते; पण आता जे आहे ते आहे. आमचे दुसऱ्या स्थानावर असणे हेच आमच्यासाठी आता महत्त्वाचे आहे.
यावेळी मिशेल स्टार्कने केकेआर संघातील युवा गोलंदाजांचे तोंडभरून कौतुक केले. तो पुढे म्हणाला, “अलीकडच्या काळात मी थोडा अधिक अनुभवी आणि थोडा मोठा आहे; पण मी जास्त टी-२० क्रिकेट सामने खेळलेलो नाही. त्यामुळे आम्ही एकमेकांकडून काही गोष्टी शिकत आहोत. आमच्याकडे एक एक्सायटिंग गोलंदाजी करणारा गट आहे. त्यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. संधी मिळताच त्यांनी मोठ्या विकेट्स घेतल्या आहेत; पण ज्यांना अद्याप संधी मिळाली नाही ते खरोखरच मेहनत घेत आहेत.”