IPL 2023, MI vs LSG Cricket Score Update: आयपीएल २०२३च्या ६३व्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सने मुंबई इंडियन्सचा पाच धावांनी पराभव केला. या रोमांचक सामन्यात लखनऊने प्रथम फलंदाजी करताना तीन विकेट्सवर १७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ पाच गडी गमावून केवळ १७२ धावा करू शकला आणि सामना गमावला. लखनऊकडून मार्कस स्टॉयनिसने सर्वाधिक नाबाद ८९ धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार क्रुणाल पांड्याने ४९ धावांची खेळी केली. मुंबईच्या जेसन बेहरेनडॉर्फने दोन गडी बाद केले. मुंबईकडून इशान किशनने ५९ आणि रोहित शर्माने ३७ धावा केल्या. टीम डेव्हिडने नाबाद ३२ धावा केल्या. लखनऊच्या यश ठाकूर आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने लखनऊ सुपरजायंट्सविरुद्धच्या पराभवाचे कारण सांगितले आहे. या धावसंख्येचा पाठलाग करता आला असता, पण आपण चांगले क्रिकेट खेळू शकलो नाही, असे त्याचे मत आहे. कर्णधार रोहितनेही कबूल केले की आम्ही शेवटच्या षटकात काही धावा वाया घालवल्या, ज्याची किंमत त्यांना मोजावी लागली. रोहितने लखनऊ संघाचा फलंदाज मार्कस स्टॉयनिसच्या खेळीचेही कौतुक केले, ज्याने ४७ चेंडूत ८९ धावा करून सामन्याला कलाटणी दिली.
आम्ही अजूनही पॉईंट्स टेबलकडे लक्ष ठेवून आहोत- रोहित शर्मा
पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, “आम्ही सामना जिंकण्यासाठी पुरेसा चांगला खेळ केला नाही. खेळात असे काही क्षण होते ज्याने दुर्दैवाने आम्हाला सामना जिंकता आला नाही. आम्ही खेळपट्टी खरोखरच चांगली वाचली आणि ती कामी आली. ती खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती आणि लखनऊने उभारलेली धावसंख्या निश्चितच पाठलाग करता येण्याजोगी होती. डावाच्या उत्तरार्धात आम्ही आमचे मोमेंटम गमावला. गोलंदाजी करताना शेवटच्या तीन षटकांमध्ये खूप धावा दिल्या आणि त्याच आम्हाला महागात पडल्या. ११व्या षटकानंतर सामन्याला कलाटणी मिळाली, मी आणि इशान लागोपाठ बाद झाल्याने लखनऊ सामन्यात परत आली आणि आम्ही हरलो.”
रोहित पुढे म्हणाला, “आम्ही फलंदाजीत ज्या प्रकारे सुरुवात केली ती खरोखरच चांगली होती, पण मी म्हटल्याप्रमाणे दुसऱ्या हाफमध्ये आम्ही आमचा मार्ग गमावला. तो (स्टॉयनिस) खरोखरच चांगला खेळला, अशा खेळपट्टीवर सरळ फटके मारणे आवश्यक होते. त्याच्याकडून ही एक शानदार खेळी होती. प्ले ऑफच्या प्रश्नावर देखील कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, “अजूनही आमच्या हातात एक सामना आहे. आम्ही पॉईंट्स टेबलकडे लक्ष ठेवून आहोत. आयपीएल २०२३मध्ये काहीही होऊ शकते हे आपण सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे नक्कीच आम्ही यासाठी आणखी प्रयत्न करू.”