IPL 2025, RCB VS MI Live Match Updates: वानखेडेवर स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सवर १२ धावांनी विजय मिळवला. रजत पाटीदार, जितेश शर्मा, विराट कोहली यांच्या दमदार खेळींच्या बळावर बंगळुरूने २२१ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबईचा संघ अडखळत होता. पण हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा या जोडीने पाचव्या विकेटसाठी ३४ चेंडूत ८९ धावांची भागीदारी करत विजयाच्या आशा जागवल्या. पण जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार आणि कृणाल पंड्या यांनी टिच्चून गोलंदाजी करत मुंबईला रोखलं. हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा ठराविक अंतरात बाद झाले आणि मुंबईच्या विजयाच्या आशा मावळल्या.
Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Highlights: मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्याचे लाईव्ह अपडेट्स
दहा वर्षांनी बंगळुरूने भेदला मुंबईचा बालेकिल्ला
तब्बल दशकभरानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने अटीतटीच्या लढतीत मुंबई इंडियन्स संघाला वानखेडे स्टेडियमवर नमवण्याची किमया केली. बंगळुरूने दिलेलं २२२ धावांच्या लक्ष्यासमोर खेळताना हार्दिक पंड्या-तिलक वर्मा यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण जोश हेझलवूड, कृणाल पंड्या यांनी टिच्चून गोलंदाजी करत बंगळुरूला शानदार विजय मिळवून दिला.
हेझलवूडने दूर केला हार्दिकचा अडसर
अनुभवी जोश हेझलवूडने तुफान फटकेबाजी करणाऱ्या हार्दिक पंड्याला बाद केलं. हार्दिकने १५ चेंडूत ४२ धावांची खेळी केली.
तिलक वर्मा मोक्याच्या क्षणी बाद
भुवनेश्वर कुमारने उत्तम लय गवसलेल्या तिलक वर्माला चकवलं. गेल्या लढतीत रिटायर आऊट करण्यात आलेल्या तिलकने २९ चेंडूत ५६ धावांची खेळी केली.
तिलक वर्माचं अर्धशतक
लखनौविरुद्ध फटकेबाजी करण्यात अपयशी ठरल्याने रिटायर आऊट केलेल्या तिलक वर्माने बंगळुरूविरुद्ध २६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.
वानखेडेवर पंड्यां बंधूंची जुगलबंदी
वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांना हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांच्यातील जुगलबंदी पाहायला मिळाली. कृणालच्या तिसऱ्या षटकात हार्दिक आणि तिलकने १९ धावा चोपून काढल्या. यामध्ये हार्दिकने २ खणखणीत षटकार लगावले.
हार्दिक पंड्याने हेझलवूडच्या एका षटकात वसूल केल्या २२ धावा
कर्णधार हार्दिक पंड्याने जोश हेझलवूडच्या एका षटकात २२ धावा कुटल्या. हार्दिकने २ षटकार आणि २ चौकार लगावले.
सुयश शर्माच्या चौथ्या षटकात १७ धावा
तिलक वर्माने सुयश शर्माच्या चौथ्या षटकात १७ धावा वसूल केल्या.
सूर्यकुमार तंबूत
यश दयाळच्या गोलंदाजीवर मिळालेल्या जीवदानाचा सूर्यकुमार यादवला फायदा उठवता आला नाही. लायम लिव्हिंगस्टोनने उत्तम झेल टिपत सूर्याची खेळी संपुष्टात आणली.
सूर्यकुमारचा झेल घेताना यश दयाळ-जितेश शर्माची टक्कर
धावगतीचं आव्हान वाढत असताना सूर्यकुमार यादवने मोठा फटका मारला. झेल टिपताना गोलंदाज यश दयाळ आणि विकेटकीपर जितेश शर्मा यांची टक्कर झाली. या गोंधळात झेल सुटला आणि दोघांनाही किरकोळ दुखापत झाली.
कृणाल पंड्याच्या बाऊन्सरवर फिल जॅक्स बाद
अनेक वर्ष मुंबई इंडियन्सचा भाग असलेल्या पण आता आरसीबीकडून खेळणाऱ्या कृणाल पंड्याने बाऊन्सवर फिल जॅक्सला बाद केलं. विराट कोहलीने त्याचा सोपा झेल टिपला.
हेझलवूडने धाडलं रियलटनला माघारी
जोश हेझलवूडच्या अचूक गोलंदाजीसमोर रायल रिकलटन निरुत्तर ठरला. हेझलवूडचा चेंडू स्टंप्स उडवत असल्याचं रिप्लेत स्पष्ट झालं आणि वानखेडेवर शांतता पसरली.
रोहित शर्मा २ चौकार आणि एका षटकारासह १७ धावा करत त्रिफळाचीत झाला. डावखुऱ्या यश दयाळने रोहितला बाद केलं. यासह मुंबईने २ षटकांत १ बाद २५ धावा केल्या आहेत.
MI vs RCB: मुंबई इंडियन्सच्या डावाला सुरूवात
आरसीबीने दिलेल्या २२२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनची जोडी उतरली आहे. तर चेंडू भुवनेश्वर कुमारच्या हातात आहे.
MI vs RCB: विराट कोहलीने रचला इतिहास
बंगळुरूने उभारला २२१ धावांचा डोंगर; रजत पाटीदारची अफलातून खेळी
कर्णधार रजत पाटीदार, विराट कोहली यांच्या अर्धशतकी खेळींच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २२१ धावांचा डोंगर उभारला. रजतने ३२ चेंडूत ६४ धावांची अफलातून खेळी केली. विराट कोहलीने ४२ चेंडूत ६७ धावा केल्या. विदर्भवीर जितेश शर्माने नाबाद ४० धावांची खेळी केली. देवदत्त पड्डीकलने २२ चेंडूत ३७ धावांची वेगवान खेळी केली. मुंबईतर्फे ट्रेंट बोल्ट आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
रजत पाटीदार सुसाट
रजत पाटीदारने सूत्रधाराची भूमिका बजावत खणखणीत फटकेबाजी केली.
बोल्टच्या षटकात आरसीबीने लुटल्या १८ धावा
अनुभवी ट्रेंट बोल्टच्या षटकात जितेश शर्मा आणि रजत पाटीदार यांनी १८ धावा लुटल्या.
रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेयर
मुंबई इंडियन्स संघाने युवा फिरकीपटू विघ्नेश पुथ्थूरच्या जागी अनुभवी रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून समाविष्ट केलं आहे. विघ्नेशने एका षटकात १० धावा देत देवदत्त पड्डीकलला बाद केलं होतं. एका षटकापुरताच विघ्नेशची भूमिका मर्यादित राहिली. उर्वरित डावात फिरकीपटूंचा प्रयोग होण्याची शक्यता नसल्याने रोहित शर्माला समाविष्ट करण्यात आलं.
लायम लिव्हिंगस्टोनचा आत्मघातकी फटका; हार्दिकने पटकावली विकेट
ऑफस्टंपच्या बाहेर पाचव्या स्टंपावरून चेंडू तटवण्याचा लायम लिव्हिंगस्टोनचा प्रयत्न पूर्णपणे फसला. जसप्रीत बुमराहने झेल टिपला.
हार्दिक पंड्याने घेतली विराट कोहलीची विकेट
सुरेख लयीत खेळणाऱ्या विराट कोहलीला अक्रॉस जाऊन विचित्र फटका खेळणं महागात पडलं. हार्दिक पंड्याचा ऑफस्टंपबाहेरचा चेंडू लेगसाईडला खेळण्याचा प्रयत्न हवेत उडाला. नमन धीरने सहज झेल घेतला. कोहलीने ४२ चेंडूत ६७ धावांची खेळी केली.
कोहली सुरात; मुंबई विस्कळीत
पहिल्या षटकात दुसऱ्याच चेंडूवर विकेट मिळाल्यानंतरही मुंबईने विस्कळीत गोलंदाजीचं प्रदर्शन घडवलं आहे. दुसरीकडे विराट कोहली उत्तम फॉर्मात असून शतकाच्या दिशेने वाटचाल करतो आहे.
विराट कोहलीचं अर्धशतक; देवदत्त पड्डीकल माघारी
सुरेख लय गवसलेल्या विराट कोहलीने मुंबईविरुद्ध वानखेडे मैदानावर अर्धशतक पूर्ण केलं. दुसऱ्या बाजूने चांगली साथ देणारा देवदत्त पड्डीकल मात्र विघ्नेशच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने २२ चेंडूत ३७ धावांची खेळी केली.
देवदत्त पड्डीकल सुसाट; पॉवरप्लेमध्ये बंगळुरूच्या ७३ धावा
फिल सॉल्ट बाद झाल्यानंतर देवदत्त पड्डीकलने सूत्रधाराची भूमिका घेत मनमुराद फटकेबाजी केली. यामुळेच बंगळुरूने पॉवरप्लेच्या ६ षटकात ७३ धावांची लूट केली.
कोहलीने बुमराहचं केलं षटकाराने स्वागत
विराट कोहलीने भारतीय संघातील सहकारी जसप्रीत बुमराहचं स्वागत षटकाराने केलं. तीन महिन्यांनंतर पुनरागमन करणाऱ्या बुमराहला कोहलीने मिडविकेट क्षेत्रात षटकार मारला.
बोल्टचा दणका; सॉल्ट माघारी
पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यावर पुढच्याच चेंडूवर डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने फिल सॉल्टला त्रिफळाचीत केलं.
तीन महिन्यांनंतर बुमराहचं पुनरागमन
५ जानेवारीनंतर बुमराह पहिल्यांदाच कोणताही व्यावसायिक सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बुमराहने प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या मनात धडकी भरवली होती. बुमराहने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ४२ विकेट्स पटकावत मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता. मात्र त्यानंतर पाठीचं दुखणं बळावल्याने त्याला प्रदीर्घ काळ खेळता आलेलं नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही तो खेळू शकला नाही. बंगळुरूस्थित नॅशनल क्रिकेट अकादमीत रिहॅब प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता तो खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
मुंबईने टॉस जिंकला; गोलंदाजीचा निर्णय
मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या लढतीत टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह दोघेही मुंबई संघात परतले आहेत.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ३३ वेळा आमनेसामने आले आहेत. यादरम्यान मुंबईने १९ सामने जिंकले, तर बेंगळुरू संघाला १४ वेळा जिंकण्यात यश आले. तर वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई आणि आरसीबी यांच्यात १२ सामने खेळले गेले. ज्यामध्ये मुंबईने ९ वेळा तर आरसीबीने ३ वेळा विजय मिळवला. म्हणजेच या मैदानावर मुंबई इंडियन्सचा आरसीबीविरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे.
तिलक वर्मा अंतिम अकरात असणार?
लखनौविरुद्धच्या लढतीत हाणामारीच्या षटकांमध्ये मोठे फटके खेळता न आल्याने तिलक वर्माला रिटायर आऊट करण्याचा निर्णय मुंबईचे प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी घेतला. या निर्णयावर प्रचंड टीका झाली. तिलकच्या जागी मिचेल सँटनर आला. पण त्याला स्ट्राईकच मिळाला नाही. मुंबईने तो सामना गमावला. रोहित शर्मा संघात परतल्यानंतर विल जॅक्स तिसऱ्या क्रमांकावर परतू शकतो. नमन धीरने लखनौविरुद्ध दमदार खेळी साकारली होती. अशा परिस्थितीत तिलकला संघात स्थान पटकावण्यासाठी संघर्ष करायला लागू शकतो.