IPL 2025, RCB VS MI Live Match Updates: चारपैकी तीन सामने गमावलेल्या मुंबई इंडियन्ससाठी आठवड्याची सुरुवात एका सकारात्मक गोष्टीने होणार आहे. दुखापत आणि नंतर रिहॅब यामुळे प्रदीर्घ काळ मैदानापासून दूर असलेला जसप्रीत बुमराह पुनरागमनसाठी सज्ज झाला आहे. नॅशनल क्रिकेट अकादमीने त्याला खेळण्यासाठी परवानगी दिली आहे. बुमराहने सहकाऱ्यांबरोबर सरावही केला. बुमराहच्या बरोबरीने मुंबईचा राजा रोहित शर्माही बंगळुरूविरुद्ध खेळण्यास तय्यार आहे. वानखेडेवर चाहत्यांच्या प्रचंड पाठिंब्यात सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मुंबईचा संघ आतूर आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूसाठी हे खडतर आव्हान असणार आहे. भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड या अनुभवी शिलेदारांकडून बंगळुरूला मोठया अपेक्षा आहेत. विराट कोहलीकडे चाहत्यांचं लक्ष आहे.
Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Live Cricket Score Updates: मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्याचे लाईव्ह अपडेट्स
देवदत्त पड्डीकल सुसाट; पॉवरप्लेमध्ये बंगळुरूच्या ७३ धावा
फिल सॉल्ट बाद झाल्यानंतर देवदत्त पड्डीकलने सूत्रधाराची भूमिका घेत मनमुराद फटकेबाजी केली. यामुळेच बंगळुरूने पॉवरप्लेच्या ६ षटकात ७३ धावांची लूट केली.
कोहलीने बुमराहचं केलं षटकाराने स्वागत
विराट कोहलीने भारतीय संघातील सहकारी जसप्रीत बुमराहचं स्वागत षटकाराने केलं. तीन महिन्यांनंतर पुनरागमन करणाऱ्या बुमराहला कोहलीने मिडविकेट क्षेत्रात षटकार मारला.
बोल्टचा दणका; सॉल्ट माघारी
पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यावर पुढच्याच चेंडूवर डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने फिल सॉल्टला त्रिफळाचीत केलं.
तीन महिन्यांनंतर बुमराहचं पुनरागमन
५ जानेवारीनंतर बुमराह पहिल्यांदाच कोणताही व्यावसायिक सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बुमराहने प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या मनात धडकी भरवली होती. बुमराहने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ४२ विकेट्स पटकावत मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता. मात्र त्यानंतर पाठीचं दुखणं बळावल्याने त्याला प्रदीर्घ काळ खेळता आलेलं नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही तो खेळू शकला नाही. बंगळुरूस्थित नॅशनल क्रिकेट अकादमीत रिहॅब प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता तो खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
मुंबईने टॉस जिंकला; गोलंदाजीचा निर्णय
मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या लढतीत टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह दोघेही मुंबई संघात परतले आहेत.
MI vs RCB Live: मुंबई इंडियन्स वि. आरसीबी हेड टे हेड
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ३३ वेळा आमनेसामने आले आहेत. यादरम्यान मुंबईने १९ सामने जिंकले, तर बेंगळुरू संघाला १४ वेळा जिंकण्यात यश आले. तर वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई आणि आरसीबी यांच्यात १२ सामने खेळले गेले. ज्यामध्ये मुंबईने ९ वेळा तर आरसीबीने ३ वेळा विजय मिळवला. म्हणजेच या मैदानावर मुंबई इंडियन्सचा आरसीबीविरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे.
तिलक वर्मा अंतिम अकरात असणार?
लखनौविरुद्धच्या लढतीत हाणामारीच्या षटकांमध्ये मोठे फटके खेळता न आल्याने तिलक वर्माला रिटायर आऊट करण्याचा निर्णय मुंबईचे प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी घेतला. या निर्णयावर प्रचंड टीका झाली. तिलकच्या जागी मिचेल सँटनर आला. पण त्याला स्ट्राईकच मिळाला नाही. मुंबईने तो सामना गमावला. रोहित शर्मा संघात परतल्यानंतर विल जॅक्स तिसऱ्या क्रमांकावर परतू शकतो. नमन धीरने लखनौविरुद्ध दमदार खेळी साकारली होती. अशा परिस्थितीत तिलकला संघात स्थान पटकावण्यासाठी संघर्ष करायला लागू शकतो.
खेळाडूंची अदलाबदली
टीम डेव्हिड, रोमारिओ शेफर्ड, नुवान तुषारा गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळले होते. विल जॅक्स आणि रीस टोपले गेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळले होते. आता ते मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहेत.
बुमराहच्या समावेशाने मुंबईला बळकटी
भारतीय संघ आणि मुंबई इंडियन्सचं प्रमुख अस्त्र असलेला जसप्रीत बुमराह पुनरागमनसाठी सज्ज झाला आहे. गेल्या हंगामात बुमराहने २० विकेट्स पटकावल्या होत्या. २०२४ हंगामात सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराह तिसऱ्या स्थानी होता.